पंतप्रधान पीक विम्याचे अर्ज आज पोहोचणार
By admin | Published: July 26, 2016 12:04 AM2016-07-26T00:04:41+5:302016-07-26T00:04:41+5:30
पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज सोमवारी पोहोचतील, अशी हमी रिलायन्स कंपनीतर्फे जिल्हा प्रशासनाला दिली होती.
८० हजार अर्ज : उरले केवळ चार दिवस
यवतमाळ : पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज सोमवारी पोहोचतील, अशी हमी रिलायन्स कंपनीतर्फे जिल्हा प्रशासनाला दिली होती. प्रत्यक्षात दिवसभर बँकांमध्ये अर्ज पोहोचले नाही. यामुळे शेकडो शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यावर सारवासारव करीत, रात्री उशिरा अर्ज येतील आणि मंगळवारी ८० हजार अर्जाचे वितरण होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात अर्ज भरण्यासाठी चार दिवस उरले आहेत.
मागणीच्या तुलनेत अर्ज अपुरे असल्याची तक्रार बँक व्यवस्थापकांनी कंपनीच्या प्रतिनिधीकडे केली होती. चारच दिवस उरलेले असतानाही जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज पोहोचले नाही. यामुळे पीक विमा भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. कंपनी सोमवारी अर्ज पाठवेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला होता. प्रत्यक्षात सोमवारी अर्ज पोहोचले नाही. याबाबत कंपनीच्या प्रतिनिधींनी सोमवारी उशिरा रात्रीपर्यंत अर्ज पोहोचतील, असे कृषी विभागाला सांगितले. मात्र अशी स्थिती मंगळवारी उद्भवू नये म्हणून बँका पाठपुरावा करीत आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा शाखेत पंतप्रधान पीक विमा योजनेचे ८० हजार अर्ज पोहोचणार आहेत. या ठिकाणावरून जिल्ह्यातील विविध बँकांना हे अर्ज पाठविले जाणार आहे. या ठिकाणी अर्ज कधी पोहोचतील यावर समोरील प्रवास अवलंबून राहणार आहे. यानंतर शेतकऱ्यांना अर्ज मिळणार आहेत.
जिल्ह्यातील बँकांना ३३ हजार अर्ज उपलब्ध झाले आहेत. ८० हजार अर्ज येणार आहेत. पूर्वी पोहोचलेले अर्ज आणि नव्याने येणारे अर्ज याची गोळाबेरीज एक लाख १३ हजारांच्या घरात जाते. यानंतरही दोन लाख ८७ हजार शेतकऱ्यांसाठी लागणारे अर्ज कुठून आणि कधी येतील, असा प्रश्न आहे. चार दिवसात ही कसरत कंपनी कशी करणार आणि या गोंधळात शेतकऱ्यांना पीक विमा काढता येणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. (शहर वार्ताहर)
अंतिम क्षणाला प्रश्न सुटेल का?
जिल्ह्याला पावणे चार लाख अर्जाची प्रतीक्षा असताना अंतिम टप्प्यात ८० हजार अर्ज वळते केले आहे. यामुळे सर्वच शेतकऱ्यांना पीक विमा काढता येईल का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर कुठल्या उपाययोजना होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विमा उतरविताना ओळखपत्र सक्तीचे
पीक विमा उतरविताना शेतकऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. यामुळे विमा काढताना यावर्षी प्रथमच शेतकऱ्यांना अर्जासोबत ओळखपत्रही जोडावे लागणार आहे.