आठवीतील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना वार्षिक १२ हजार शिष्यवृत्तीसाठी,करा अर्ज ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 05:46 PM2024-10-17T17:46:32+5:302024-10-17T17:48:15+5:30

आठवीतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध : डिसेंबर महिन्यात होणार परीक्षा

Apply for 12,000 annual scholarship for financially weak students in class VIII? | आठवीतील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना वार्षिक १२ हजार शिष्यवृत्तीसाठी,करा अर्ज ?

Apply for 12,000 annual scholarship for financially weak students in class VIII?

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ :
आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिकस्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत व्हावी, तसेच प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिकस्तरापर्यंत होणारी गळती रोखण्याच्या उद्देशाने शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) घेण्यात येते. शिष्यवृत्तीस पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे वार्षिक १२ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी पाच ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.


इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न साडेतीन लाखांपेक्षा कमी आहे. त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीत शिकत असलेल्या आणि अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येते. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदार, तलाठ्यांचा २०२३-२४च्या आर्थिक उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा लागणार आहे. विद्यार्थी, विद्यार्थिनी इयत्ता सातवीत किमान ५५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. अनुसूचित जाती, जमातीचा विद्यार्थी किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे. 


विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेतून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व मागासवर्गीयांच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. २२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे वार्षिक १२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. 


परीक्षेसाठी दोन विषय 
बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी, असे दोन परीक्षेसाठी विषय असणार आहेत. बौद्धिक क्षमता चाचणी ही मानस- शास्त्रीय चाचणी असून, यामध्ये कार्यकार णभाव, विश्लेषण, संकलन आदी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. शालेय क्षमता चाचणी ही सामान्यतः इयत्ता सातवी व आठवीच्या अभ्यासक्रमांवर आधारित राहणार आहे. यात सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित, असे तीन विषय असतील. तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात. 


यांना मिळणार नाही शिष्यवृत्ती
सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येते. मात्र, विनाअनुदानित शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, शासकीय वसतिगृहात सवलतीचा, भोजन व्यवस्था व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी व सैनिकी शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र राहणार आहेत.

Web Title: Apply for 12,000 annual scholarship for financially weak students in class VIII?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.