जुनी पेन्शन योजना लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 10:43 PM2019-09-09T22:43:45+5:302019-09-09T22:44:53+5:30
नवीन अंशदायी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना उद्ध्वस्त करणारी आहे. ती बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समितीने केली आहे. राज्यातील १५ लाख कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. स्थानिक एलआयसी चौकातून निघालेला मोर्चा विविध मार्गाने फिरत तिरंगा चौकात धडकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वात सोमवारी लाक्षणिक संप पुकारण्यात आला. मागणीची पूर्तता न झाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला.
नवीन अंशदायी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना उद्ध्वस्त करणारी आहे. ती बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समितीने केली आहे. राज्यातील १५ लाख कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले.
स्थानिक एलआयसी चौकातून निघालेला मोर्चा विविध मार्गाने फिरत तिरंगा चौकात धडकला. मोर्चेकऱ्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. यावेळी मागण्यांची पूर्तता न झाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला. १५ मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले. केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावे, अनुकंपा भरती तत्काळ व विनाअट करावी यासह विविध मागण्यांचा यामध्ये समावेश होता.
आरोग्य कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, कोअर कमिटी, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, पेन्शन बचाव कृती समिती, महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक आघाडी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, लेखावर्गीय कर्मचारी संघटना, प्राथमिक शिक्षक संघ, लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, शिक्षक महासंघ, प्राथमिक शिक्षक संघटना, नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना, शिक्षक परिषद, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटना, भारतीय मजदूर संघटना यासह अनेक संघटना आंदोलनात सहभागी होत्या. प्रत्येक संघटनेच्या तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी बैठकांचे सत्र घेऊन मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतरही विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यवतमाळात मोर्चासाठी धाव घेतली होती.
मोर्चानंतर तिरंगा चौकात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य समन्वयक मधुकर काठोळे होते. यावेळी अनेकांनी मोर्चेकऱ्याना मार्गदर्शन केले. सभेचे सूत्रसंचालन कैलास राऊत यांनी केले.