आॅगस्टपर्यंत प्रलंबित कामे मार्गी लावा
By admin | Published: July 3, 2015 12:23 AM2015-07-03T00:23:29+5:302015-07-03T00:23:29+5:30
आॅगस्टपर्यंत सर्व प्रलंबित कामे मार्गी लावा अशा सूचना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तंबी : दारव्हा येथे आढावा बैठक
दारव्हा : आॅगस्टपर्यंत सर्व प्रलंबित कामे मार्गी लावा अशा सूचना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दारव्हा येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना केल्या.
विविध विभागाच्या विकासकामांचा आढावा घेण्याकरिता येथील बचत भवनात बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी पद्भार स्वीकारल्यानंतर त्यांची दारव्हा उपविभागाला पहिलीच भेट होती. त्यांच्या कामाचा धडाका पाहता बैठकीत नेमक काय होणार, याची सर्वांना धास्ती होती. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांच्या मनातील भीती दूर करत मला कुणाचे नुकसान करायचे नाही, तुमच्याकडून काम करून घ्यायचे आहे, असे सुरुवातीला सांगून टाकले. त्यामुळे आजची आढावा बैठक शांततेत पार पडली.
बैठकीत तहसील, पंचायत समिती, कृषी विभागाच्या योजनांची प्रगती व कामांचा आढावा घेण्यात आला. त्या-त्या विभाग प्रमुखांनी या बाबत माहिती दिली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कामांबाबत कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. लोकांची प्रामाणिकपणे कामे करा, त्यांच्यापर्यंत पोहचा. गावाला भेट देण्याच्या तारखा व आपला मोबाईल क्रमांक बोर्डावर लिहा, काम करताना काही अडचणी येत असेल तर आपल्याला कळवा, असे सांगितले. प्रलंबित कामांबद्दल बोलताना सर्व प्रलंबित कामे आॅगस्टपर्यंत पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
बैठकीला उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, तहसीलदार प्रकाश राऊत, ठाणेदार मानकर, गटविकास अधिकारी घुगे, तालुका कृषी अधिकारी अंगाईत, सहाय्यक गटविकास अधिकारी राजीव शिंदे यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, महसूल, पंचायत समिती व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाला भेट देऊन कामांची तपासणी केली. त्यानंतर अनेक लोकांकडून निवेदने स्वीकारली. (तालुका प्रतिनिधी)