शहरात नगरोत्थानातील आठ कोटींच्या कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:10 PM2019-06-29T22:10:10+5:302019-06-29T22:10:31+5:30
नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. या सभेत चर्चेला आलेले पंधराही विषय चर्चेअंती मंजूर करण्यात आले. जिल्ह्यात नगरोत्थान व दलितेत्तर, नावीण्यपूर्ण योजनेतील आठ कोटींच्या प्रस्तावित कामांना मंजुरी देण्यात आली. याशिवाय शहरात उपजीविका केंद्र सुरू करण्याचा ठराव घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. या सभेत चर्चेला आलेले पंधराही विषय चर्चेअंती मंजूर करण्यात आले. जिल्ह्यात नगरोत्थान व दलितेत्तर, नावीण्यपूर्ण योजनेतील आठ कोटींच्या प्रस्तावित कामांना मंजुरी देण्यात आली. याशिवाय शहरात उपजीविका केंद्र सुरू करण्याचा ठराव घेण्यात आला.
नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांच्या अध्यक्षतेत सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. सभागृहात मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दिनदयाळ अंत्योदय योजनेतून राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरी उपजीविका केंद्र तयार करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. हनुमान आखाडा चौक येथे महिला आर्थिक विकास महामंडळाकडून हे केंद्र सुरू केले जाणार आहे. पावसाळ्यातील उपाययोजनांची कामे मंजूर करण्यात आली. ही कामे झोननिहाय न करता प्रभागनिहाय करावीत, मुरूम टाकण्याचे कंत्राट एकाच व्यक्तीला न देता जास्तीत जास्त ठेकेदारांना द्यावे, जेणेकरून १५ दिवसांच्या आत आवश्यक तिथे मुरूम टाकल्या जाईल, अशी सूचना नगरसेवक बबलू देशमुख यांनी सभागृहात केली. दर्शना इंगोले यांनी नाली बांधकामाचा मुद्दा उपस्थित करत उमरसरा भागात मोकाट डुकरांचा हैदोस असल्याचे सांगितले. कच्च्या नाल्यांमध्ये डुकरांचा ठिय्या असल्याने ठिकठिकाणी गटार तयार झाल्याचे त्यांनी सांगितले. किमान वेळेत नाली बांधकाम करावे, अशी मागणी त्यांनी केली. यानंतर वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी प्राप्त १६ कोटी पाच लाखांच्या शिल्लक रकमेतून वाघापूर येथे काँक्रिट रस्त्याचे काम, पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी लागणारी वित्तीय मान्यतेला मंजुरी, सुंदर शाळा पुरस्कार देण्यासाठी वित्तीय मान्यता, इंदोर येथील सदस्यांच्या अभ्यास दौऱ्याला मान्यता व वार्षिक लेखे तयार करून नगरपरिषद संचालकाकडे पाठविण्यास मान्यता यासह सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली.
बसस्थानकाला जागा देताना अट
तात्पूरत्या स्वरूपात बसस्थानकासाठी आर्णी मार्गावरील पालिकेची जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव चर्चेला आला. यावर नगरसेवक प्रवीण प्रजापती यांनी आक्षेप घेत ही जागा व्यापारी संकुलासाठी प्रस्तावित आहे. त्याची निविदा प्रक्रिया झाली. नगरविकास विभागाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव गेला आहे. ही मान्यता आल्यास बसस्थानकासाठी दिलेली जागा परिवहन महामंडळाने तत्काळ खाली करून द्यावी, अशी अट टाकण्याची सूचना प्रजापती यांनी केली.
मुदत संपलेले पाणी पिण्याकरिता
सभागृहात पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स सदस्यांसाठी ठेवण्यात आल्या. नगरसेवक अमोल देशमुख यांनी या बॉटलची एक्सपायरी पाहिली असता त्या कालबाह्य असल्याचे निदर्शनास आले. १२ जानेवारी २०१९ ला तयार झालेल्या बॉटल्सची उपयोगीता केवळ चार महिन्याची असल्याचे त्यावर स्पष्ट नमूद होते. त्यानंतरही सदस्यांसाठी एक्सपायरी गेलेले पाणी पिण्यास ठेवण्यात आल्याने यावर आक्षेप घेतला. नंतर चूक सुधारत नवीन बॉटल्स ठेवण्यात आल्या.