साडेतीन कोटींच्या पूरक कृती आराखड्याला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 09:59 PM2018-04-04T21:59:41+5:302018-04-04T21:59:41+5:30
अपुऱ्या पावसाने जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला कृती आराखडाही अपुरा ठरत आहे. त्यामुळे तीन कोटी ४१ लाख रुपयांच्या पूरक कृती आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अपुऱ्या पावसाने जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला कृती आराखडाही अपुरा ठरत आहे. त्यामुळे तीन कोटी ४१ लाख रुपयांच्या पूरक कृती आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. आता जिल्ह्याचा पाणीटंचाई कृती आराखडा १४ कोटी २० लाखांचा झाला आहे. टंचाई निवारण्याच्या इतिहासातील जिल्ह्यातील हा सर्वात मोठा कृती आराखडा होय.
यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नदी-नाले कोरडे पडले असून विहिरींनी तळ गाठला आहे. पाणी पुरवठा योजनाही ठप्प झाल्या आहेत. प्रकल्पही तळाला जात आहे. अशा स्थितीत पाणीटंचाई निवारणासाठी दहा कोटी ७९ लाखांच्या कृती आराखड्याला जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली होती. परंतु पाणीटंचाईची तीव्रता पाहता हा निधी अपुरा पडत आहे. त्यामुळे पूरक कृती आराखड्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने प्रशासनाकडे सादर केला. त्यावरून जिल्हाधिकाºयांनी तीन कोटी ४१ लाख रुपयांच्या पूरक कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली. त्यात पुसद तालुक्यातील माळपठार भागातील ४० गावातील पाणीटंचाई निवारण्यासाठी पूरक नळ योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच खासगी विहिरी अधिग्रहण आणि टँकरसाठी एक कोटींचा निधी आरक्षित आहे. ३३ टँकर आणि १०३ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे.
इसापूरचे पाणी पैनगंगेच्या पात्रात
उमरखेड शहर आणि ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. यावर मात करण्यासाठी पुसद तालुक्यातील इसापूर धरणातून १.७५ दलघमी पाणी पैनगंगा पात्रात सोडण्यात आले. यामुळे ४५ गावांना दिलासा मिळणार आहे.