वृक्ष लागवड जनचळवळ करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 09:26 PM2019-06-01T21:26:06+5:302019-06-01T21:27:03+5:30
वृक्ष लागवड मोहिमेला जन चळवळ करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहे. या चळवळीला प्रत्येकाचा हातभार लागला , तर निसर्गाचे सौंदर्य परत येण्यास वेळ लागणार नाही. याकरिता वृक्ष लागवड गरजेची आहे. याबाबत यवतमाळचे विभागीय वन अधिकारी भाऊराव राठोड यांच्याशी साधलेला संवाद.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वृक्ष लागवड मोहिमेला जन चळवळ करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहे. या चळवळीला प्रत्येकाचा हातभार लागला , तर निसर्गाचे सौंदर्य परत येण्यास वेळ लागणार नाही. याकरिता वृक्ष लागवड गरजेची आहे. याबाबत यवतमाळचे विभागीय वन अधिकारी भाऊराव राठोड यांच्याशी साधलेला संवाद.
त्याच त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा वृक्ष लावले जातात काय?
वृक्ष लागवड करण्यासाठी वन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेत पूर्णत: पारदर्शकता आणली आहे. विशेष म्हणजे वृक्ष लागवड करणारे सर्व स्पॉट आॅनलाईन आहेत. यात कुणाला शंका वाटली, तर ते त्या संकेतस्थळावर जाऊन पाहणी करू शकतात. प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेटही देऊ शकतात. यामुळे त्याच जागी पुन्हा वृक्ष लागवड होण्याचा प्रकार थांबला आहे.
वृक्ष लागवडीत गैरप्रकार झाला तर?
वृक्ष लागवडीत गैरप्रकार घडू नये म्हणून पारदर्शकता आणली. स्मार्टफोनचा वापर करून एका विशिष्ट सॉफ्टवेअरने संकेतस्थळ जोडले. ज्या ठिकाणी वृक्षांची लागवड झाली, त्याचा अक्षांश आणि रेखांश या ठिकाणी दिसतो. एक अक्षांश आणि रेखांश पुन्हा ओव्हरलॅप होत नाही. तेच ठिकाण दाखविले तर हे ओव्हरलॅप दृष्टीस पडेल. अशा ठिकाणी दंडात्मक कारवाई व महाराष्ट्र शिस्त नियमानुसार कारवाई होणार आहे.
जंगल का वाढत नाही?
वृक्षारोपणाचे काम गत तीन-चार वर्षांपासून सुरू झाले. नवीन जंगल तयार होत आहे. प्रत्यक्षस्थळी भेट दिल्यास नवीन जंगल आपल्या दृष्टीस पडतील. सध्या झाडे लहान आहेत. ती मोठी झाल्यानंतर येत्या काळात जंगल वाढलेले दिसतील. यवतमाळ जिल्हा आधीच वनसंपदेने नटलेला आहे. वनांच्या सौंदर्यात भविष्यात भर पडेल. यवतमाळ जिल्हा वनसंपदेने नटलेला आहे. मात्र बेसुमार वृक्षतोड झाल्याने जंगलाच्या सौंदर्याला बाधा पोहोचली. तथा भविष्यात जंगलामध्ये मोठी वाढ होणार आहे.
जिल्ह्यातील १४२ नर्सरीमधून यावर्षी रोपटी आणली जाईल. या नर्सरीत एक कोटी १४ लाख ३७ हजार रोपटी तयार आहे. यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद विभागातील यंत्रणा वृक्ष लागवड करण्यासाठी तयार आहे. खड्डे खोदले जात आहे. त्यात पुढे रोपटी लावली जातील.
यंदा दीड कोटी झाडे लावणार
वृक्ष लागवड करताना अनेक बारकावे टिपण्यात आले आहे. कमी पाण्यात जगणारे आणि अधिक काळ टिकणारे वृक्ष लावण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार विविध नर्सरीमध्ये रोपटी तयार करण्यात आली आहे. कडूनिंबासारख्या रोपट्यांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात यावर्षी एक कोटी ३७ लाग रोपटी लावण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये वनविभागाला ६४ लाख ४७ हजार रोपटी लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. ग्रामपंचायतींसह विविध संघटना आणि शासकीय विभागांचे सहकार्य मिळणार आहे.