बेंबळाच्या पाण्यासाठी एप्रिलचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:16 PM2018-01-10T22:16:56+5:302018-01-10T22:17:06+5:30
आॅक्टोबर २०१९ पर्यंत बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे नियोजन होते. मात्र, यावर्षीची भीषण पाणीटंचाई बघता येत्या मार्च-एप्रिलपर्यंतच पाणी आणण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आॅक्टोबर २०१९ पर्यंत बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे नियोजन होते. मात्र, यावर्षीची भीषण पाणीटंचाई बघता येत्या मार्च-एप्रिलपर्यंतच पाणी आणण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले.
यावर्षी जिल्ह्यात अपुरा पाऊस झाला. त्यामुळे शहरातील पाणीटंचाई निवारणार्थ अमृत योजनेतून बेंबळा प्रकल्पातील पाणी आणण्याचे काम सुरू आहे. संबंधित कंपनीकडून पाईपचा पुरवठा नियमित होण्यासाठी पालकमंत्री मदन येरावार यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाने पाईपलाईनचा पुरवठा नियमित करण्यासाठी विशेष तरतूद मंजूर केली. ३०२ कोटी रूपये खर्चाची अमृत योजना ३० महिन्यांत पूर्ण होऊन आॅक्टोबर २०१९ पर्यंत यवतमाळात पाणी पोहोचणार होते. तथापि यावर्षीची पाणीटंचाई लक्षात घेऊन येत्या मार्च-एप्रिलपर्यंत बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे प्रयत्न आहे.
बेंबळा ते टाकळी फाटापर्यंत तब्बल १९.७५ किलोमीटरची एक हजार एम.एम.(डीआय) डकटाईल आर्यन पाईपलाईन जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यत आणली जात आहे. या पाईपसाठी आत्तापर्यंत जीवन प्राधिकरण कंत्राटदाराला ६० टक्के रक्कम अदा करीत होते. मात्र आता पालकमंत्री मदन येरावार यांच्या प्रयत्नामुळे नगरविकास विभागाने पाईपसाठी जीवन प्राधिकरणाकडून १०० टक्के निधी त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश काढले.
१८ टक्के कामानंतर पंपिंगचे टेंडर
५० टक्के नागरी काम झाल्याशिवाय पंपिंग मशीनची निविदा काढता येत नाही. मात्र पालकमंत्री मदन येरावार यांनी विशेष तरतूद म्हणून केवळ १८ टक्के नागरी काम झाल्यास पंपिंग मशीनची निविदा काढण्यासाठी पाठपुरावा केला. परिणामी जीवन प्राधिकरणाने बेंबळावर ५५० हॉर्स पॉवरचे ४ पंपिंग मशीन आणि टाकळी येथील फिल्टर प्लाँटवर २०० हॉर्स पॉवरच्या ४ पंपिंग मशीनच्या निविदा काढण्यास मंजुरी दिल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी दिली.