कृती आराखड्यात बनावट अधिग्रहणाला चाप
By admin | Published: March 11, 2017 01:02 AM2017-03-11T01:02:04+5:302017-03-11T01:02:04+5:30
पाणीटंचाई कृती आराखड्यात दरवर्षी अधिग्रहणातून पदाधिकारीच आपली तिजोरी भरतात.
महागावात पाणीटंचाईचा आढावा : अधिग्रहणाच्या निम्म्या प्रस्तावांना लावली कात्री
महागाव : पाणीटंचाई कृती आराखड्यात दरवर्षी अधिग्रहणातून पदाधिकारीच आपली तिजोरी भरतात. या प्रकाराला चाप बसविण्याची मागणी करून अधिग्रहणाच्या निम्म्या प्रस्तावाला कात्री लावण्यात आली आहे. गरज असेल तेथे यंत्रणेमार्फत पाहणी करून निर्णय घेतले जावे, असे निर्देश आमदार राजेंद्र नजरधने यांनी दिले आहे.
महागाव पंचायत समितीच्या सटवाराव नाईक सभागृहात पाणीटंचाई आढावा बैठकीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. गतवर्षी केलेल्या उपाययोजना आणि आता जाणवू लागलेली पाणीटंचाई याचे वास्तव या सभेत अनेक गावच्या सरपंचांनी मांडले. जलयुक्त शिवारवर करोडो रुपये खर्च झाल्यानंतरही पाणीटंचाई कायम आहे. अनेक गावात विहीर अधिग्रहण, टँकरची मागणी करण्यात येत आहे. जलयुक्त शिवारवर संशय निर्माण झाल्याने कृषी विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्याची सूचना आमदारांनी दिली.
सभेत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सभेला सभापती गोदावरी जाधव, जिल्हा परिषद सदस्य अनिल नरवाडे, विलास भुसारे, परशराम डवरे, पंचायत समिती सदस्य गजानन कांबळे, संदीप ठाकरे, नत्थू आढाव, जनाबाई जाधव, गोदावरी कदम, बेबीताई मुडे, नगरपंचायत मुख्याधिकारी रश्मी चव्हाण, तहसीलदार नारायण इसाळकर, बीडीओ राहुल शेळके, कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे, आर.डी. रणवीर आदी उपस्थित होते.
(शहर प्रतिनिधी)