यवतमाळ नगरपरिषदेचे क्षेत्र आता ७० चौरस किलोमीटर
By admin | Published: August 31, 2016 01:59 AM2016-08-31T01:59:25+5:302016-08-31T01:59:25+5:30
यवतमाळ नगरपरिषदेची हद्द पूर्वी दहा चौरस किलोमीटर एवढी होती. परंतु लगतच्या आठ ग्रामपंचायतींचा
हद्दवाढ : लोकसंख्या अडीच लाख, हद्द सहा पटीने वाढली
यवतमाळ : यवतमाळ नगरपरिषदेची हद्द पूर्वी दहा चौरस किलोमीटर एवढी होती. परंतु लगतच्या आठ ग्रामपंचायतींचा समावेश झाल्याने ही हद्द सहा पटीने वाढून तब्बल ७० चौरस किलोमीटरची झाली आहे. त्यामुळे तेथील विकासावर नजर ठेवताना नगरपरिषदेची कसोटी लागणार आहे.
यवतमाळ नगर परिषदेचे कार्यक्षेत्र पूर्वी मर्यादित होते. नव्या बहुतांश वसाहती या ग्रामपंचायत क्षेत्रात मोडत होत्या. बसस्थानकापासून कोणत्याही दिशेने एक-दोन किलोमीटर पुढे गेले तरी नगर परिषदेची हद्द समाप्त होत होती. पूर्वी नगरपरिषदेचे चहुबाजूचे कार्यक्षेत्र केवळ १० किलोमीटरचे होते. नगरपरिषद क्षेत्राची लोकसंख्या पूर्वी केवळ एक लाख १६ हजार एवढी होती. परंतु हद्दवाढीनंतर नगरपरिषद सर्वच बाबतीत ‘प्लस’ झाली आहे.
वडगाव, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, मोहा, उमरसरा, भोसा, डोर्ली या ग्रामपंंचायती यवतमाळ नगरपरिषदेमध्ये समाविष्ठ झाल्या. त्यामुळे नगरपरिषदेची लोकसंख्या एक लाख १२ हजारांवरुन थेट अडीच लाखांवर पोहोचली. नगरपरिषदेचे कार्यक्षेत्र तर सहा पटीने वाढले. पूर्वी दहा किलोमीटर असलेले हे कार्यक्षेत्र आता ७० किलोमीटर एवढे झाले आहे. शहराच्या चहूबाजूने घाट ते घाट अशी नगरपरिषदेची नवी हद्द निश्चित करण्यात आली आहे. नगरपरिषदेची हद्दवाढ झाली असली तरी उत्पन्नाचे स्रोत मात्र वाढलेले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
छत्रपतींचा पुतळा तीन महिन्यात उभा राहणार
४यवतमाळ शहरातील नाट्यगृह, तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा विषय आगामी तीन महिन्यात मार्गी लावला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुभाष राय यांनी दिली. ते म्हणाले, बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा सौंदर्यीकरणाचा विषयही असाच निधी असूनही थंडबस्त्यात पडला होता. तो विषय आपण प्रयत्नपूर्वक मार्गी लावला. पांढरकवडा रोडवरील हिंदू स्मशानभूमीला आता महामार्गाकडून एकमेव प्रवेश द्वार राहणार आहे. तेथील इतर प्रवेशद्वार बंद केले जाणार आहे. तेथे सुरक्षा रक्षक व अन्य सोईसुविधा निर्माण केल्या जाणार असल्याचे सुभाष राय यांनी सांगितले.
नगराध्यक्षांची प्रभागनिहाय स्वच्छता मोहीम
४यवतमाळ नगरपरिषदेचे अध्यक्ष सुभाष राय यांनी शहरातील समस्या सोडविण्यासाठी प्रभागनिहाय मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेवर असताना त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळातील विविध मुद्यांवर चर्चा केली. ते म्हणाले, आपण शहरातील प्रत्येक प्रभागात रस्ते, नाल्या व अन्य समस्या निकाली काढण्यासाठी मोहीम राबवित आहो. सध्या तिसरा प्रभाग सुरू आहे. आपल्या सोबत नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, मजूर, कामगार अशी सुमारे सव्वाशे जणांची फौज आहे. त्या सर्वांची जेवणाची व्यवस्था आपण स्वत: करीत आहो. स्वत:ही दुपारचे जेवण त्यांच्या सोबतच घेत आहोत. आपण हद्दवाढीनंतर लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातही भेटी दिल्या. मात्र तेथे गेली कित्येक वर्ष विकास कामे मार्गी लागली नसल्याचे सुभाष राय यांनी सांगितले. रस्ते, नाल्या, पथदिवे, स्मशानभूमी या समस्या आजही कायम आहे. स्मशानभूमीतील लोखंड लंपास करण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. नागरिकांची अनास्थाही त्यासाठी तेवढीच कारणीभूत ठरल्याचे सुभाष राय यांनी सांगितले.