यवतमाळातील वीज चोरीच्या भागात एरियल बंच केबल टाकण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 10:56 AM2018-03-16T10:56:32+5:302018-03-16T10:56:42+5:30
वीज चोरी जादा असणाऱ्या भागात आता एरियल बंच केबल टाकण्याचा निर्णय महावितरणने घेतला. यामुळे वाढत्या वीज चोरी आणि हानीला लगाम घातला जाणार आहे.
रवींद्र चांदेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वीज चोरी जादा असणाऱ्या भागात आता एरियल बंच केबल टाकण्याचा निर्णय महावितरणने घेतला. यामुळे वाढत्या वीज चोरी आणि हानीला लगाम घातला जाणार आहे.
संपूर्ण राज्यातच वीज चोरी आणि हानीचे प्रमाण वाढत आहे. काही जिल्ह्यांमये तर वीज चोरी व हानीचे प्रमाण २५ टक्केपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या चोरीला लागम घालण्याचे आव्हान महावितरणपुढे उभे टाकले आहे. त्यावर मात करण्यासाठी आता जादा वीज चोरी आणि हानी असलेल्या भागात एरियल बंच केबल टाकण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. यामुळे वीज चोरी आणि हानीला आळा बसू शकेल, अशी महावितरणला अपेक्षा आहे. अमरावती परिमंडळातील भाजीबाजार, कडबिबाजार आदी परिसरात वीज चोरी व हानीचे प्रमाण जादा असल्याने तेथे एरीयल बंच केबल टाकण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहे.
नागपूर परीक्षेत्राचे प्रादेशिक संचालक खंडाईत यांनी बुधवारी अमरावतीत बैठक घेतली. त्यात वारंवार आढावा घेऊनही परिमंडळातील काही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे वसुली आणि ग्राहकांच्या सेवेत पाहिजे तसा फरक पडत नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला. ग्राहक सेवा व महावितरणच्या एकूणच कामासाठी कॅज्युअल अॅटीट्युड असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. चांगले काम करणाऱ्यांचा गौरव, तर कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांच्या कामाची नोंद गोपनीय अहवालात घेतली जाणार असल्याची तंबी त्यांनी दिली. महावितरण ही प्रथम सेवा, नंतर मोबदला घेणारी कंपनी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१८ हजार मेगावॅटची दररोज खरेदी
महावितरण दररोज १८ हजार मेगावॅट वीज खासगी व शासकीय स्त्रोतांकडून खरेदी करून ती ग्राहकांना पुरविते. महावितरणच्या उत्पनाचा ८७ टक्के खर्च वीज खरेदीवर होतो. त्यामुळे ग्राहकांना वापरलेल्या विजेचे पैसे वेळेत भरण्याची शिस्त लावणे गरजेचे असल्याचे भालचंद्र खंडाईत यांनी सांगितले.
अमरावती परिमंडळात वीज हानीत सतत होणारी वाढ, चिंतेची बाब असून ग्राहकांना अचूक बिल मिळावे, तसेच दर्जेदार सेवा मिळावी यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना कामाचे टार्गेट दिले.