पांढरकवडात दुधाची आवक अर्ध्यावर
By admin | Published: May 7, 2017 12:59 AM2017-05-07T00:59:40+5:302017-05-07T00:59:40+5:30
जंगलातील चारा कमी झाल्यामुळे वैरणासाठी जनावरांची भटकंती सुरु झाली आहे़ पाण्याच्या कमतरतेमुळे गाई-म्हशींच्या दुधाचे प्रमाणही कमी झाले आहे़
१७ हजार लिटर दुधाची आवश्यकता : पाणी व वैरणाच्या कमतरतेमुळे जनावरांची भटकंती
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : जंगलातील चारा कमी झाल्यामुळे वैरणासाठी जनावरांची भटकंती सुरु झाली आहे़ पाण्याच्या कमतरतेमुळे गाई-म्हशींच्या दुधाचे प्रमाणही कमी झाले आहे़ यामुळे ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायावर भीषण संकट निर्माण झाले आहे़ एकट्या पांढरकवडा शहरासाठी किमान १७ हजार लिटर दुधाची गरज असताना केवळ १० ते साडेदहा हजार लिटर दुधाची आवक होत असल्याने नागरिकांना पॉकेटच्या दुधावर गरज भागवावी लागत आहे.
तालुक्यात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे गायी व म्हशी या दुधाळ जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात शेती व्यवसायाशी जनावरांचा जवळचा समंध आहे़ मे महिन्याची सध्या जेमतेम सुरूवात झाली असूनसुध्दा गुरांना वैरण मिळेनासे झाले आहे़ त्यामुळे गुरांना जंगलामध्ये चाऱ्याकरीता सर्वदूर फिरावे लागत आहे़ या जनावरांमध्ये गाई-म्हशी यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे़ दुधाचा व्यवसाय या प्राण्यांवरच अवलंबून आहे़ परंतु या प्राण्यांचा वैरण आणि पाणी टंचाईमुळे अक्षरश: कोंडमारा होत असल्यामुळे दुग्ध व्यवसायालासुध्दा याचा फार मोठा फटका बसत आहे़
तालुक्यातील मांगुर्डा, मुची या परिसरात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु यावर्षी कधी नव्हे एवढी चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. आतापर्यंत चारा व पाण्याची टंचाई एवढी मोठी टंचाई कधीच निर्माण झाली नसल्याची माहिती मांगुर्डा मुची येथील श्यामराव गवळी यांनी दिली. पावसाचे कमी प्रमाण व पाण्याची पातळी खाली जात असल्यामुळे जंगलातील हिरवा चारा दिसेनासा झाला आहे़ जनावरांना चराईसाठी जंगलात किंवा टेकड्यावर नेण्यात येते़
यासोबत शेतातील धुऱ्यावरसुध्दा त्यांना चराईसाठी सोडल्या जाते़ परंतु आता ओलिताची पिके कमी घेतल्या जात असल्यामुळे व विहिरीतील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे आता काही शेतकरीच पुर्णपणे ओलिताची पिके घेताना दिसतात़ याचाही परिणाम चारा कमी होण्यावर झाला आहे़ ओलिताची पिके कमी असल्याने ठराविक शोतातच हिरवा चारा पाहावयाला मिळत आहे़ ज्याच्या शेतात असा चारा आहे त्यांना स्वत:च्या जनावरांसाठीच हा चारा उपयोगी पडत आहे़ उन्हाळ्यात जंगलातील चाऱ्याला वाढत्या तापमानामुळे आगी लागत असल्याने वैरण नष्ट होते़ आगीच्या वनव्यात वैरण नष्ट होत आहे.