मुलकीत दोन गटांत सशस्त्र हल्ला
By admin | Published: April 22, 2017 01:41 AM2017-04-22T01:41:01+5:302017-04-22T01:41:01+5:30
मोठे वडगाव परिसरातील मुलकी येथील रामकृष्णनगरात दोन गटात गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र हल्ला झाला.
यवतमाळ : मोठे वडगाव परिसरातील मुलकी येथील रामकृष्णनगरात दोन गटात गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र हल्ला झाला.
यामध्ये दोन्ही गटांनी परस्परांविरूद्ध तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही गटातील चौघांना अटक केली. दोघे पसार आहेत. मारहाणीचा वचपा काढण्यासाठी अमराईपुरा येथील कुख्यात आरोपी अजय ऊर्फ गोलू श्याम सोळंकी (२०), मंथन अनिल लहाडके (२०), स्वप्निल ऊर्फ बॉब, गजानन बोबडे (१९) रा. धर्माजीनगर यांनी मुलकी येथील धीरज बंडू उईके (३३) व त्याचा मित्र संजय ज्ञानेश्वर आत्राम यांच्यावर तलवार व लोखंडी रॉडने हल्ला केला. माझ्या भाच्याला मारहाण का केली, असे म्हणत गोलू व त्याच्या सहकाऱ्यांनी हल्ला केला. घटनास्थळी नागरिक गोळा झाल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
याच प्रकरणात अजय ऊर्फ गोलू श्याम सोळंकी याच्या तक्रारीवरून पोलिसांनी धीरज बंडू उईके आणि संजय ज्ञानेश्वर आत्राम यांच्याविरूद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, टोळीविरोधी पथकाने रात्रीतूनच दोन्ही गटातील चार जणांना अटक करून वडगाव रोड पोलिसांच्या ताब्यात दिले. स्वप्निल बोबडे पसार झाला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)