६० वन कर्मचाऱ्यांची फौज वाघांच्या मागावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:50 PM2018-08-29T23:50:35+5:302018-08-29T23:51:58+5:30
१५ शेतकरी-शेतमजूर-गुराख्यांची शिकार करणाºया वाघाच्या शोधार्थ वन खात्याच्या ६० अधिकारी-कर्मचाºयांची फौज पांढरकवडा वन विभागांतर्गत येणाºया जंगलात तैनात करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : १५ शेतकरी-शेतमजूर-गुराख्यांची शिकार करणाऱ्या वाघाच्या शोधार्थ वन खात्याच्या ६० अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज पांढरकवडा वन विभागांतर्गत येणाºया जंगलात तैनात करण्यात आली आहे. या मोहिमेत वाघाला घेरण्यासाठी चार हत्ती दाखल होण्याची वन खात्याला प्रतीक्षा आहे.
पांढरकवडा वन विभागांतर्गत आतापर्यंत वाघाने १५ जणांची शिकार केली. बुधवारी हा १५ वा बळी घेतला. या शिकारीमुळे एकीकडे गावकऱ्यांमधून वाघाला पकडण्याची मागणी होत असताना वाघाकडून एका पाठोपाठ शिकारीही केल्या जात आहे. बुधवारच्या घटनेनंतर वाघ शोध मोहिमेला प्रचंड वेग आला आहे. पुसद, यवतमाळ येथील वाहने तसेच ६० पेक्षा अधिक वन अधिकारी-कर्मचाºयांची नियुक्ती वाघाच्या शोधार्थ करण्यात आली आहे. पेंच-नवेगावबांध व नागझिरा अभयारण्यातील स्पेशल टायगर्स प्रोटेक्शन फोर्सच्या तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. एकाच वेळी मादी आणि तिच्या पिलांना पकडण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जाते.
वाघाच्या या वाढत्या हैदोसाच्या पार्श्वभूमीवर वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच सर्व संबंधितांची बैठक बोलविली होती. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक, वन विकास महामंडळाचे उच्च पदस्थ अधिकारी, पांढरकवडाच्या उपवनसंरक्षक, राळेगावचे उपविभागीय महसूल अधिकारी आदी मंडळी या बैठकीला उपस्थित होती. त्यात आयएफएस के.अभर्णा यांनी वाघाला पकडण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायच्या आहेत व त्याकरिता काय-काय व्यवस्था लागणार आहे, याचे प्रेझेन्टेशन या बैठकीत सादर केले. त्यात त्यांनी वाघाला घेरता यावे म्हणून चार हत्तींची मागणी नोंदविली. कारण ज्या भागात वाघ शिकारी करतो आहे ते ९५ टक्के क्षेत्र वन विकास महामंडळाचे आहेत. त्यातील काही भाग अतिशय दुर्गम असल्याने तेथे वाहन जाणे शक्य नाही. अशा वेळी हत्तीची मदत घेऊन वाघाला बेशुद्ध करता येऊ शकते. मात्र वन विकास महामंडळाकडून वाघ पकडण्याबाबत तेवढे ताकदीचे प्रयत्न होताना दिसत नाही.
या वाघाला पकडण्यासाठी नागपूरच्या वन मुख्यालयातून वेगाने सूत्रे न हलविली गेल्यास वाघाकडून आणखी काहींची शिकार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाघ पकडण्यासंबंधी मार्गदर्शक तत्वे आधीच जारी करण्यात आली आहे. त्या तत्वानुसारच मोहीम राबवावी लागते. वाघ पकडण्यासंबंधी पांढरकवडाच्या उपवनसंरक्षक के.अभर्णा यांनी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची बैठक घेऊन मोहिमेसंबंधी आवश्यक सूचना दिल्या असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
वाघाच्या बेशुद्धीचे तीन प्रयत्न फसले
यापूर्वी या वाघाला पकडण्यासाठी बेशुद्ध करण्याचे दोन ते तीन प्रयत्न झाले. तेव्हापासून सदर वाघीण मनुष्य दिसला की, चवताळून त्याच्यावर थेट झडप घालते. त्यामुळे एक्सपर्ट वन कर्मचारीही पुरेशा तयारी अभावी त्या वाघासमोर सहजासहजी व एकटे-दुकटे जाणे टाळत आहेत. वाघिणीचे तीनही पिले मोठे झाल्याने कदाचित तेसुद्धा शिकार करीत असावे, अशी शंका वन खात्याला आहे. न्यायप्रविष्ठ प्रकरणामुळे वाघाला जीवानिशी ठार मारता येत नाही. त्यामुळे त्याचा शोध घेणे, त्याला बेशुद्ध करणे व पकडून व्याघ्र प्रकल्पात नेऊन सोडण्याचे आव्हान पांढरकवडा वन विभागापुढे आहे.