सेना-भाजपाकडे सक्षम उमेदवारच नाही
By admin | Published: June 13, 2014 12:32 AM2014-06-13T00:32:32+5:302014-06-13T00:32:32+5:30
बंजारा बहुल पुसद विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपाकडे सक्षम उमेदवार नाही. नाईकांच्या या बालेकिल्ल्यात सक्षम विरोधकाचा शोध सुरू आहे.
मनोहरराव नाईकांचा बालेकिल्ला : आरती फुफाटेंना राष्ट्रवादीत घेऊन विरोधक संपविले
राजेश निस्ताने - यवतमाळ
बंजारा बहुल पुसद विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपाकडे सक्षम उमेदवार नाही. नाईकांच्या या बालेकिल्ल्यात सक्षम विरोधकाचा शोध सुरू आहे.
पुसदवर गेल्या कित्येक दशकांपासून नाईक घराण्याचे वर्चस्व आहे. मनोहरराव नाईक या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. यावेळी राष्ट्रवादीकडून मनोहरराव नाईकांसोबतच पत्नी अनिता नाईक व ययाती नाईक यांची नावेही चर्चेत आहेत. महिलांना ३३ टक्के जागा देण्यासाठी राष्ट्रवादीने सुरक्षित मतदारसंघांचा शोध चालविला आहे. त्यात पुसद विधानसभा मतदारसंघाचे नाव प्रकर्षाने पुढे येते. तसे झाल्यास अनिता नाईक उमेदवार राहू शकतात. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ययाती नाईक यांनासुद्धा प्रोजेक्ट केले गेले. गेल्या वेळी बंडखोरी करून ऐनवेळी आव्हान उभे करणारे निलय नाईक यावेळी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. गेल्या वेळी निलय नाईक तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. या बंडखोरीमुळे ते राजकीयदृष्ट्या माघारल्याचे सांगितले जाते.
नाईक घराण्याच्या विरोधात टिकू शकेल असा उमेदवार आज तरी महायुतीकडे नाही. पुसद मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. मात्र यावेळी हा मतदारसंघ अदलाबदलीत भाजपाला देऊन शिवसेनेने यवतमाळवर दावा सांगितला आहे. मात्र प्रत्यक्षात शिवसेना आणि भाजपा यांच्याकडे पुसदमध्ये सक्षम उमेदवारच नाही. विधानसभेच्या दृष्टीने अनेक नावे चर्चेत आहेत. त्यात माजी आमदार, व्यापारी, कंत्राटदार आदींचा समावेश आहे. परंतु यापैकी कुणीही नाईकांपुढे सक्षम उमेदवार ठरणार नाही, असे राजकीय गोटात बोलले जाते. सध्या मोदी लाटेमुळे महायुतीला पोषक वातावरण आहे. परंतु त्यांच्याकडे उमेदवारच नसल्याने पुन्हा राष्ट्रवादीची सरशी होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
विरोधक तयार होऊ द्यायचा नाही आणि झालाच तर राजकीय आश्रय देऊन त्याला झिरो करायचे अशी पुसदची राजकीय परंपरा राहिली आहे. डॉ. आरती फुफाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले गेले. गेल्या निवडणुकीत आरती फुफाटे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविताना तब्बल ४६ हजार मते घेत घाम फोडला होता. मात्र नाईकांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन त्यापूर्वीच डॉ. फुफाटेंसाठी राष्ट्रवादीचे दरवाजे खुले केले. त्या राष्ट्रवादीत आल्याने आता शिवसेनेकडे सक्षम उमेदवारच उरला नाही. गेल्या पाच वर्षात शिवसेनेला सक्षम नेतृत्व तयार करता आले नाही. त्यामुळे सेनेने हा मतदारसंघ आता भाजपाला देऊ केला आहे. मात्र भाजपाचीही अवस्था तीच आहे. या मतदारसंघातील आदिवासी (आंध) विरुद्ध बंजारा समाज या जुन्या वादाचा ईफेक्ट विधानसभेत दिसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत नाईकांनी काँग्रेसच्या शिवाजीराव मोघेंना २१ हजार मतांची आघाडी मिळवून दिली. या आघाडीवर मात्र बंजारा आणि आदिवासी या दोनही समाजांनी दावा केला आहे. यावेळी महायुतीकडून पुसदमध्ये कुणाला रिंगणात उतरविले जाते याकडे सर्वांच्या नजरा आहे. मराठा समाजाचाही उमेदवार असावा असा एक सूर ऐकायला मिळत आहे. शिवसेनेने अल्पसंख्यक उमेदवार दिला जाऊ शकतो का या दृष्टीने चाचपणी चालविली आहे. सत्ताधारी पक्षाने आघाडी ऐवजी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसकडून तरुण चेहऱ्याला संधी दिली जाईल. येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे.