दारव्हा पंचायत समितीवर सेना
By admin | Published: February 25, 2017 01:04 AM2017-02-25T01:04:26+5:302017-02-25T01:04:26+5:30
पंचायत समिती निवडणुकीत दहापैकी नऊ जागा जिंकत शिवसेनेने एकतर्फी विजय संपादन केला.
एकतर्फी विजय : दहा पैकी नऊ जागा जिंकल्या, नेतृत्वामुळे यश
मुकेश इंगोले दारव्हा
पंचायत समिती निवडणुकीत दहापैकी नऊ जागा जिंकत शिवसेनेने एकतर्फी विजय संपादन केला. त्यामुळे मागील पंचवार्षिकमध्ये सत्ता गाजविल्यानंतर यावेळीसुद्धा जनतेनी कौल दिल्याने पंचायत समितीवर सेनेचाच भगवा फडकणार आहे.
या निवडणुकीत अनेक गणामध्ये तुल्यबळ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे लढत खर तर काट्याची होईल, असे चित्र असताना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची प्रचंड मेहनत आणि या भागातील जनतेचा त्यांच्यावर विश्वास कायम असल्याने तालुक्यात जणू भगवी लाट निर्माण झाली व या लाटेत सेना उमेदवारांची लॉटरी लागली. लोही गणात राष्ट्रवादीतून सेनेत प्रवेश केलेल्या सुनीता राऊत यांनी काँग्रेसचे अमोल चौधरी यांचा पराभव केला. भाजपा तिसऱ्या तर राष्ट्रवादी पाचव्या क्रमांकावर फेकल्या गेली. हा गण सर्वसाधारण असताना सेनेने भविष्याचा वेध घेत महिला उमेदवाराला संधी दिली. शेजारच्या चिखली गणात मात्र शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला. सेना बंडखोर अपक्ष संतोष ठाकरे यांनी बाजी मारली. काँग्रेस तिसऱ्या, राष्ट्रवादी चौथ्या तर भाजप पाचव्या स्थानावर राहिली. डोल्हारी गणात राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का बसला. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अमोल राठोड यांनी आपल्या पत्नीला रणांगणात उतरविले होते. परंतु या लाटेत त्यांचा टिकाव लागला नाही. सेनेच्या उषा चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला तर याच गटातील भांडेगाव गणात सेनेच्या सविता जाधव यांनी काँग्रेसच्या बेबीताई गोमासे यांना पराभूत केले. दोन्ही गणात भाजपा तिसऱ्या स्थानावर राहिली. वास्तविक या गट व गणात काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी होती. तरीसुद्धा त्यांना सेनेचा विजयरथ रोखता आला नाही.
बोरी गणात ओमप्रकाश लढ्ढा यांच्या प्रवेशामुळे भाजपाची ताकद वाढली होती. परंतु या वाढलेल्या ताकदीवर मात करत शिवसेनेचे साहेबराव कराळे यांनी भाजपाचे महादेव माहुरे यांचा पराभव केला. राष्ट्रवादी तिसऱ्या तर काँग्रेस चौथ्या स्थानावर राहिली. तळेगाव गणात काँग्रेस उमेदवार जातीय समीकरणात फिट बसत असतानाही विजयी होऊ शकला नाही. सेनेच्या सिंधू राठोड यांनी काँग्रेसच्या अश्विनी खोडे यांच्यावर मात केली. राष्ट्रवादीला तिसऱ्या तर भाजपाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
लाडखेडमध्ये शारदा दुधे तर वडगाव गणात शारदा मडावी या सेना उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुक्रमे माधुरी दुधे व वीणा कोर्टेकर याां पराभव केला. दोन्ही ठिकाणी भाजप तिसऱ्या तर लाडखेडमध्ये काँग्रेस पाचव्या व वडगावमध्ये चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेली. महागाव क गणात राष्ट्रवादीला विजयाची मोठी अपेक्षा होती. या गणाचे विद्यमान सदस्य प्रा.चरण पवार हे पक्षाला शून्य या आकड्यापासून वाचवू शकतात, असे बोलले जात होते. परंतु त्यांनासुद्धा सेना उमेदवार पंडित राठोड यांनी ४९ मतांनी का होईना मात्र पराभूत केले. तर सायखेड गणाची लढत सेना-भाजपामध्ये झाली. या लढतीत सेनेचे नामदेव जाधव यांनी भाजपाचे मधुसूदन लोहकरे यांना पराभूत केले. दोनही गणात काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिली. पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी दिग्गज उमेदवार दिले. सर्व ताकद पणाला लावली. पण तरीसुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व संपूर्ण राज्यात लाटेवर स्वार असणाऱ्या भाजपला देखील दारव्हा तालुक्यात भोपळाही फोडता आला नाही. शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवत शहराप्रमाणे ग्रामीण भागातही आपलाच दबदबा कायम असल्याचे दाखवून दिले. अस्तित्वाच्या या लढाईसाठी राज्यमंत्री संजय राठोड यांनी मेहनत घेतली.