सेनेचे पालकमंत्री पद सुरक्षित
By admin | Published: July 22, 2016 01:59 AM2016-07-22T01:59:00+5:302016-07-22T01:59:00+5:30
यवतमाळचे पालकमंत्री पद भाजपाला हवे असले तरी युतीच्या फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेकडील
युतीचा फॉर्म्युला : शिवसेनेच्या दहा मंत्र्यांकडे १२ जिल्हे
यवतमाळ : यवतमाळचे पालकमंत्री पद भाजपाला हवे असले तरी युतीच्या फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेकडील हा जिल्हा सुरक्षित असल्याचा दावा सेनेच्या एका उच्च पदस्थ नेत्याने केला आहे.
सुमारे दीड वर्ष संजय राठोड यांच्या रुपाने जिल्ह्यात राज्य सरकारचे एकमेव मंत्री होते. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या मदन येरावार यांना संधी दिली गेली. ना. येरावार मंत्री होताच भाजपाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी यवतमाळचे पालकमंत्री पद भाजपाला मिळावे म्हणून जोरदार मागणी लावून धरली आहे. जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपाचे असल्याचे सांगून भाजपाने पालकमंत्री पदावर दावा सांगितला आहे. शिवसेनेला वाशिम, नांदेड या लगतच्या जिल्ह्यात पाठवावे, असा सल्लाही भाजपाच्या गोटातून दिला जात आहे. पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी भाजपाने विविध स्तरावरुन मोर्चेबांधणी चालविली असली तरी शिवसेनेचे नेते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड मात्र बिनधास्त आहे. कारण त्यांचा युतीच्या फॉर्म्युल्यावर विश्वास असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जाते.
राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री पदे, खाते वाटप याचा फॉर्म्युला ठरला. त्याच वेळी शिवसेनेकडे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद असावे आणि भाजपाकडे कोणते याचाही फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. या फॉर्म्युल्यामध्ये बदल न करण्याचेही धोरण त्यावेळी ठरविले गेल्याचे सांगितले जाते. युती सरकार स्थापनेच्यावेळी भाजपा-सेनेमध्ये ठरलेल्या या फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेकडील यवतमाळचे पालकमंत्री पद भविष्यातही शाबूत राहणार असल्याचे मानले जाते. त्यामुळेच संजय राठोड निश्चिंत दिसत आहे. हा फॉर्म्युला असूनही भाजपाने पाच आमदार संख्येचे कारण पुढे करून यवतमाळ शिवसेनेकडून काढून घ्यावा, यासाठी प्रयत्न चालविल्याने शिवसेनेच्या गोटात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पालकमंत्री पदाच्या आडोश्याने आगामी जिल्हा परिषद, नगरपरिषद निवडणुका, विधान परिषद निवडणुका जिंकण्याचा, त्यासाठी जिल्हाभर पक्षबांधणी करण्याचा भाजपाचा मनसुबा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
दोन मंत्र्यांकडे दुहेरी जिल्हे
या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेच्या दहा मंत्र्यांकडे १२ जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये यवतमाळ, नांदेड, परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद, भंडारा, मुंबई शहर, रत्नागिरी, ठाणे, सातारा आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. दिवाकर रावते आणि डॉ. दीपक सावंत या दोन मंत्र्यांकडे अनुक्रमे नांदेड व परभणी आणि भंडारा-उस्मानाबाद या जिल्ह्यांची दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे. आता मंत्रिमंडळ विस्तारात दोन राज्यमंत्री वाढल्याने त्यांच्याकडे उपरोक्त दुहेरीपैकी एका-एका जिल्ह्याची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.