जिल्हा परिषदेत सेना-राकाँ युती

By admin | Published: March 21, 2017 12:02 AM2017-03-21T00:02:18+5:302017-03-21T00:02:18+5:30

जिल्हा परिषदेत शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली आहे.

Army-RCA alliance in Zilla Parishad | जिल्हा परिषदेत सेना-राकाँ युती

जिल्हा परिषदेत सेना-राकाँ युती

Next

पत्रपरिषदेत घोषणा : राष्ट्रवादीला सत्तेत भागीदारी
यवतमाळ : जिल्हा परिषदेत शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली आहे. सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसला भागीदारी देणार असल्याची घोषणाही शिवसेनेचे संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूळकर यांनी सोमवारी सायंकाळी विश्रामगृहावर झालेल्या संयुक्त पत्रपरिषदेतून केली. सत्ता स्थापनेसाठी पद वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरला नाही. राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेकडे ३१ सदस्यांचे संख्याबळ झाले असून अपक्षालाही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे नेरूळकर यांनी सांगितले.
सत्ता स्थापनेसाठी ३१ सदस्यांचे संख्याबळ जिल्हा परिषदेत आवश्यक आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या सत्तेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर राष्ट्रवादीचे नेते आमदार मनोहरराव नाईक व माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्याशी झालेल्या चर्चेतून युती करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे नाव अद्याप निश्चित झाले नाही. तसेच सभापतींचेही नाव रात्रीतून निश्चित केले जाईल व त्यासंदर्भातील अधिकृत माहिती दोनही पक्षाच्यावतीने देण्यात येईल, असे नेरूळकर यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत वाटा मागितला नाही तरी तो आम्ही देणारच असल्याचे नेरूळकर यांनी यावेळी जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते निमीष मानकर गैरहजर असल्याबाबत विचारणा केली असता आमदार मनोहरराव नाईक यांनी ही चर्चा म्हणजे टेबल न्यूज असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ता स्थापनेसाठी राज्यात युतीत असलेल्या भाजपाकडून कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचेही नेरूळकर यांनी सांगितले. शिवसेनेने भाजपा सोबतची युती अख्या महाराष्ट्रात तोडली आहे. विधानसभेतही किती दिवस टिकते याची वाट बघा, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या पत्रपरिषदेला राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार मनोहरराव नाईक, माजी आमदार संदीप बाजोरिया, माजी आमदार प्रकाश देवसरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, शिवसेना उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, प्रवीण पांडे, संजय रंगे उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)

सत्ता स्थापनेसाठी जुनाच फॉर्म्युला
शिवसेनेने सत्तेत वाटा देताना राष्ट्रवादीसाठी जुनाच फॉर्म्युला कायम ठेवला जाणार आहे. यापूर्वी राष्ट्रवादी-सेनेची जिल्हा परिषदेत युती झाली तेव्हा राष्ट्रवादीने अध्यक्ष व उपाध्यक्षपद स्वत:कडे ठेऊन आरोग्य व समाज कल्याण समिती शिवसेनेला दिली होती. त्यावेळी शिवसेनेकडे १२ चे संख्याबळ होते. तर राष्ट्रवादीचे २२ सदस्य होते. काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी हे समीकरण जुळविले होते. आता शिवसेनेकडे २० सदस्य तर राष्ट्रवादीकडे ११ सदस्य असल्याने जुन्या फॉर्म्युलाप्रमाणे राष्ट्रवादीला आरोग्य व शिक्षण आणि समाज कल्याण समितीचे सभापतीपद देणार असल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

बाजोरिया म्हणाले, अध्यक्ष काँग्रेसचाच !

शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा करण्यात आलेल्या पत्रपरिषदेत माजी आमदार संदीप बाजोरिया उपस्थित होते. तेथून बाहेर पडल्यानंतर मात्र त्यांनी उद्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा काँग्रेसचाच होईल, असा दावा काही माध्यम प्रतिनिधींशी खासगीत बोलताना केला. सेनेकडून विधान परिषदेचा ‘हिशेब’ मिळाला, मात्र जिल्हा परिषदेतील जुन्या सेना-राष्ट्रवादीच्या सत्ता स्थापनेच्यावेळीचा ‘हिशेब’ बाकी असल्याचे त्यांनी सांतिगले.

दिवसभर राजकीय घडामोडींची गरमागरमी
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचे संख्याबळ जुळविण्यासाठी सर्वच पक्षांच्या प्रमुखांकडून धडपड सुरू होती. रविवारी शिवसेना-राष्ट्रवादीची बैठक फिसकटल्यानंतर शिवसेनेकडून भाजपापुढे प्रस्ताव ठेवण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्षासह एका पदाधिकाऱ्याने हा प्रस्ताव भाजपाच्या स्थानिक नेत्यापुढे ठेवला. दरम्यान पुन्हा सोमवारी शिवसेना व राष्ट्रवादींच्या नेत्यांची युती मुद्यावर बैठक झाली. दुपारी ही बैठक संपताच भाजपाचे स्थानिक नेते राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात पोहोचले. या घडामोडीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व मारेगावातील जिल्हा परिषद सभापती या घटनांवर वॉच ठेऊन होते. शिवसेनेच्या खासदारांनीसुद्धा अपक्ष सदस्याचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्षांशीही चर्चा केली. दरम्यान राष्ट्रवादी-सेना युतीच्या पत्रपरिषद सुरू असताना राष्ट्रवादीतील स्थानिक युवा पदाधिकारी भाजपा जिल्हाध्यक्षाच्या निवासस्थानी चर्चा करीत होते. संख्याबळ पुरेसे नसल्याने युतीची घोषणा करतानाही सत्ता स्थापनेचा विश्वास दोनही नेत्यांच्या बोलण्यातून दिसत नव्हता. संपूर्ण रात्रभर घडामोडी सुरूच होत्या. काठावरचे बहुमत भक्कम करण्यासाठी शिवसेनेकडूनही भाजपा किंवा काँग्रेसला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू होते.

Web Title: Army-RCA alliance in Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.