आर्णी, घाटंजी, दारव्हात कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:18 PM2018-08-16T22:18:25+5:302018-08-16T22:18:46+5:30

आर्णी, घाटंजी, दारव्हात पावसाचा कहर असून मागील १२ तासात तब्बल ४० मि.मी. इतका पाऊस नोंदविला आहे. दारव्हा शहरात बसस्थानकासह संपूर्ण परिसरच पुराच्या पाण्याने व्यापला. येथील वाहतूक बंद होती.

Arni, Ghatanji, Darwat Kahar | आर्णी, घाटंजी, दारव्हात कहर

आर्णी, घाटंजी, दारव्हात कहर

googlenewsNext
ठळक मुद्देमूसळधार पाऊस : १२ तासात ३५ मि.मी.च्या सरासरीने कोसळला, वस्त्यांमध्ये शिरले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आर्णी, घाटंजी, दारव्हात पावसाचा कहर असून मागील १२ तासात तब्बल ४० मि.मी. इतका पाऊस नोंदविला आहे. दारव्हा शहरात बसस्थानकासह संपूर्ण परिसरच पुराच्या पाण्याने व्यापला. येथील वाहतूक बंद होती. अशीच स्थिती आर्णी, घाटंजी व नेर या शहरासह ग्रामीण भागातही अनुभवास मिळाली.
दारव्हा शहरात लेंडी नाल्याला पूर आल्याने समस्या निर्माण झाली. या पुराचे पाणी थेट शहरात घुसून येथील मुख्य गोळीबार चौक, आर्णी रोड, बसस्थानक चौक आणि कारंजा मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले, रेल्वे स्टेशन परिसरात पाणी साचले. स्वामी समर्थनगरमधील नाल्याचे पाणी परिसरात शिरल्याने बिकट स्थिती निर्माण झाली. दारव्हा तालुक्यातील तेलगव्हाणचा पाझर तलाव फुटला. चोर(खोपडी), खोपडी आणि जांभोरा येथील तलाव कोणत्याही क्षणी फुटण्याची भीती आहे. तोरनाळा येथील चार माती बंधारे वाहून गेले. अडाण नदीला प्रचंड पूर असून दारव्हा-कारंजा मार्गावरील बोदेगाव येथील पुलावरून तब्बल सात फूट पाणी होते. त्यामुळे तेथील वाहतूक पूर्णत: बंद होती. तालुक्यातील सर्वच नदीनाल्यांना एकाचवेळी पूर आल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. रामगाव व निळोणा या दोन गावातील आठ जनावरे पुरात वाहून गेली. बोथ येथील शेतजमीन पूर्णत: पाण्याखाली आली आहे. नुकसानीचा अंदाज पावसामुळे बांधणे यंत्रणेलाही शक्य होत नाही.
आर्णी तालुक्यात पावसामुळे ग्रामीण भाग पाण्याखाली आला आहे. शहरातील उत्तम टॉकीज परिसरात पाणी साचले आहे. व्यापाऱ्यांच्या गोडाऊनमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. कृषी केंद्रांच्या गोडाऊनमधील रासायनिक खते या पाण्यात विरघळले आहे. रस्त्यांमध्ये पाणी साचल्याने तारांबळ उडत आहे. आर्णीतील बाजारपेठेत तळघरांमध्ये असलेल्या सर्व व्यापारी संकुलात पाणी साचल्याने लाखो रुपयांचा माल पाण्यात भिजला. नागपूर-तुळजापूर मार्गावरील पुलांवरून पाणी असल्याने वाहतूक बंद होती. पावसाचा जोर पाहता अनेक शाळांना सुटी देण्यात आली. पैनगंगा, अडाण या नद्यांना पूर असल्याने राणीधानोरा, साकूर, कवठाबाजार, मुकिंदपूर या भागात शेतीचे मोठे नुकसान झाले. प्रशासनानेही आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी सतर्कतेचा इशारा देत पथक तैनात केले. तहसीलदार, ठाणेदार, नगरपरिषद मुख्याधिकारी पूरपरिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
नेर तालुक्यात पुरामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. पहिल्यांदाच येथील नद्यांना पूर आला असून मिलमिली नदी दुथडी भरून वाहात आहे. तालुक्यातील काही सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.
घाटंजी तालुक्यात संततधार पावसामुळे घाटंजी-आर्णी मार्ग व किन्ही रस्ता पूर्णत: बंद होता. चिंचोली येथील पुलावरून अडाण नदीचे पाणी वाहात होते. कुऱ्हाड, डांगरगाव येथेही अडाण नदी पुलावरून वाहात असल्याने ताडसावळी, सायफळ या गावातील शेतशिवारात पुराचे पाणी घुसले. संध्याकाळपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने येथील यंत्रणा सतर्क असल्याचे तहसीलदार जी.के. हामंद यांनी सांगितले. सरासरी ३५ मि.मी. इतका पाऊस कोसळल्याने सर्वच जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पाण्याने पिकांना संजीवनी मिळाल्याचे समाधानही आहे.

Web Title: Arni, Ghatanji, Darwat Kahar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस