आर्णीत प्रेमसंबंधातून युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 09:54 PM2019-06-03T21:54:31+5:302019-06-03T21:54:46+5:30
शहरातील ड्रीम लॅन्ड सीटी परिसरात प्रेमसंबंधातून तिघांनी एका युवकाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना रविवारी रात्री १.३० वाजता घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपीचे घर पेटवून दिले. आर्णी पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून नांदेड येथून दोन आरोपींना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : शहरातील ड्रीम लॅन्ड सीटी परिसरात प्रेमसंबंधातून तिघांनी एका युवकाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना रविवारी रात्री १.३० वाजता घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपीचे घर पेटवून दिले. आर्णी पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून नांदेड येथून दोन आरोपींना अटक केली.
अकील खान (३२) रा. देऊरवाडी पुनर्वसन असे मृताचे नाव आहे. अकीलचे ड्रीम लॅन्ड सीटी येथील मुलीसोबत एक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यातूनच त्याचा खून झाला. या प्रकरणी शकील शब्बीर खान याच्या तक्रारीवरून आरोपी सतीश जमदाळे (२२) रा. देऊरवाडी, नितीन कदम (३४) रा. पुसद, मंदा रामराव रामटेके (४२) रा. ड्रीम लॅन्ड सीटी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील नितीन कदम व मंदा रामटेके या दोघांना पोलिसांनी नांदेड येथून अटक केली.
असा आहे घटनाक्रम
अकील हा महालक्ष्मी लॉन येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. रविवारी रात्री मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आकाश गिरोळकर, अविनाश वाठोरे, अश्विन रेकेवार, राहुल कोळसकर यांच्यासोबत एका बारमध्ये बसले होते. याच दरम्यान अकीलला एक फोन आला. तो दहा मिनिटात येतो म्हणून तेथून निघून गेला. त्यानंतर त्याने राहुल कोळसकर याला फोन करून तत्काळ ड्रीम लॅन्ड सीटी येथे बोलाविले तसेच दुसरा मित्र अशपाक यालाही फोन कॉल केला. त्यानंतर हे सर्व जण ड्रीम लॅन्ड सीटी येथे पोहोचले. तेथे अकीलचा आरोपींसोबत वाद सुरू होता. याच दरम्यान सतीश जमदाळे याने अकीलच्या छातीत चाकूने वार केला. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. आरोपींकडून त्यानंतरही मारहाण सुरू होते. हे दृश्य पाहून अकीलचे मित्र धावून गेले. त्यामुळे आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अकीलला ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर जमावाने आरोपींचे घर पेटवून दिले. रात्री दरम्यान काही काळ शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ठाणेदार यशवंत बावीस्कर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे पथकासह आरोपीच्या शोधात निघाले. त्यांनी नांदेड येथून दोघांना अटक केली. तर तिसरा आरोपी हा पुण्याकडे पळाल्याचे सांगण्यात येते.