आर्णी तालुक्याला झोडपले; 105 मिमी विक्रमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 05:00 AM2022-07-13T05:00:00+5:302022-07-13T05:00:11+5:30
पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्या ओसंडून वाहत आहेत. अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याने काही ठिकाणची वाहतूक खोळंबली आहे. मंगळवारी एसटी महामंडळाने मार्ग वाहतुकीयोग्य नसल्याने दहा बसफेऱ्या रद्द केल्या. दोन दिवसांपूर्वी मुकुटनब-पाटण मार्गावरील वळण रस्ता वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३५.७ मि. मी. पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर आर्णी तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले असून, या तालुक्यात २४ तासांमध्ये १०५ मि. मी. एवढा विक्रमी पाऊस नाेंदविला गेला आहे. मंगळवारीही पावसाचा जाेर कायम असून, पावसामुळे काही भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.
जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यातही पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य हवालदिल झाले होते. मात्र, मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून, या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत यवतमाळ तालुक्यात २१.२, बाभूळगाव १०.९, कळंब २१.६, दारव्हा १९.४, दिग्रस ४३.७, आर्णी १०५.५, नेर २२.६, पुसद १६.५, उमरखेड २५.५, महागाव ४०, वणी ५४.३, मारेगाव १९.६, झरीजामणी ५५.२, केळापूर ४४.२, घाटंजी ५७, तर राळेगाव तालुक्यात २५.६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारीही यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाची रिपरिप सुरू होती.
पुराने अडविले रस्ते, दहा बसफेऱ्या केल्या रद्द
- पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्या ओसंडून वाहत आहेत. अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याने काही ठिकाणची वाहतूक खोळंबली आहे. मंगळवारी एसटी महामंडळाने मार्ग वाहतुकीयोग्य नसल्याने दहा बसफेऱ्या रद्द केल्या. दोन दिवसांपूर्वी मुकुटनब-पाटण मार्गावरील वळण रस्ता वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. अंजनखेड-राणी धानोरा रस्ताही वाहतुकीयोग्य नसल्याने या मार्गावरील बसफेऱ्या रद्द करून बसचा मार्ग बदलविण्यात आल्याची माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.
उमरखेडमध्ये आज शाळांना सुट्टी
- संततधार पावसामुळे संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी उमरखेड शहरासह तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि शासकीय, निमशासकीय काॅलेजला एक दिवस बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले आहे. तालुक्यात तीन-चार दिवसांपासून पाऊस असल्याने नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत.