अॅरोमा पार्क खाताहेत गटांगळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 06:00 AM2019-09-04T06:00:00+5:302019-09-04T06:00:10+5:30
वनविभागाच्या या पार्कसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात चेनलिंक फेनसिंग, खडीकरणासह रस्ता बांधकाम, पाथ-वे, विहीर खोदकाम, ग्रील कंपाऊंड, पेविंग वॉक, तिकीट घर, वनचेतना केंद्र आदी कामांचा समावेश आहे. या वेगवेगळ्या कामांसाठी अपेक्षित खर्चही निश्चित करण्यात आलेला आहे.
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : नागरिकांना विरंगुळा आणि शहराचे सुशोभिकरण यासाठी नेर येथे तयार होत असलेला अॅरोमा पार्क (वनउद्यान) गटांगळ्या खात आहे. मागील चार वर्षांपूर्वी सुरू झालेले काम कधी पूर्ण होईल याविषयी अनिश्चितता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम केले जात आहे. होत असलेल्या कामाचा दर्जाही सुमार असल्याचे अनेक बाबींवरून स्पष्ट होते.
वनविभागाच्या या पार्कसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात चेनलिंक फेनसिंग, खडीकरणासह रस्ता बांधकाम, पाथ-वे, विहीर खोदकाम, ग्रील कंपाऊंड, पेविंग वॉक, तिकीट घर, वनचेतना केंद्र आदी कामांचा समावेश आहे. या वेगवेगळ्या कामांसाठी अपेक्षित खर्चही निश्चित करण्यात आलेला आहे. आतापर्यंत झालेल्या कामांचा दर्जा तपासण्याचे सौजन्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दाखविले गेले नाही. किशोर जयस्वाल यांना या कामाचा कंत्राट देण्यात आला आहे.
प्रत्यक्षात कामावर झालेला लाखो रुपये खर्च पाहता कामाची गती आणि दर्जा शोचनिय आहे. सदर पार्कचे काम करत असलेला कंत्राटदार बांधकाम विभागाला जुमानत नसल्याचे सांगितले जाते. वेळोवेळी पैसा उपलब्ध करून देऊनही कामाला विलंब लावला जात आहे. दरम्यान, वनविभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन कामाला होत असलेल्या विलंबाविषयी विचारणा केली. तीन आठवडे लोटूनही कंत्राटदाराने या पत्रावर उत्तर दिले नाही.
अॅरोमा पार्क महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नातून होत आहे. कोटी रुपयाचा निधी त्यांनी या कामासाठी उपलब्ध करून दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी अॅरोमा पार्कचे लोकार्पण व्हावे, यासाठी त्यांचे प्रयत्न आहे. तशी विचारणाही त्यांनी केली. यावर वनविभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारले. मात्र बांधकाम विभाग कंत्राटदाराकडे बोट दाखवित आहे. वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पार्कच्या कामाविषयी गांभीर्य दाखविले जात नसल्याचे दिसून येते.
अॅरोमा पार्कची कामे लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. कामात होत असलेल्या दिरंगाईबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करण्यात येईल. शिवाय नवीन कामांसाठी प्रस्ताव टाकण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
- संजय राठोड, महसूल राज्यमंत्री म.रा.
अॅरोमा पार्कचे काम २०१४-१५ ला सुरू झाले. कामाला होत असलेल्या विलंबाविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र उत्तर मिळाले नाही.
- अंकित नेहारे,
प्र. वनपरिक्षेत्र अधिकारी, नेर
अॅरोमा पार्कचे काही काम शिल्लक आहे. ते लवकरच पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. वनविभागाने पार्कच्या कामाविषयी विचारलेल्या पत्राला उत्तर दिले आहे.
- ए.बी. काझी, सहायक अभियंता, सा.बां. विभाग नेर