१५० एकरात तारा पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:26 PM2018-06-26T23:26:25+5:302018-06-26T23:28:00+5:30
चक्रीवादळामुळे जमिनदोस्त झालेल्या टॉवरच्या वीज तारा पडून असल्याने सुमारे १५० एकर शेती पडीक राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आलेगाव, आसेगाव, मांगूळ आदी गावाला १९ जून रोजी चक्रीवादळाचा तडाखा बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगावदेवी : चक्रीवादळामुळे जमिनदोस्त झालेल्या टॉवरच्या वीज तारा पडून असल्याने सुमारे १५० एकर शेती पडीक राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आलेगाव, आसेगाव, मांगूळ आदी गावाला १९ जून रोजी चक्रीवादळाचा तडाखा बसला. यात घरांसह शेताचे मोठे नुकसान झाले. घराचा सज्जा अंगावर पडून दोन जणांचा मृत्यू झाला. काही जण जखमी झाले होते.
घटनेवरून आठ दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही शेतात पडून असलेल्या वीज तारा उचलल्या गेल्या नाही. खरिपाची पेरणी परिसरात सुरू झाली आहे. मात्र तारा पडून असल्याने आलेगाव, आसेगाव, मांगूळ आदी गावातील २५ ते ३० शेतकरी अजूनही आपल्या शेतात पेरणी करू शकले नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन दिले. दरम्यान, नुकसानग्रस्त शेताचे सर्वेक्षण तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे. या लोकांना मदतीची अपेक्षा आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केली होती. त्यावेळी त्यांनी मृताचे कुटुंबीय व नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत दिली जाईल, असे सांगितले होते. आलेगाव येथील सुधीर किसन राठोड व तुळशीदास राठोड यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना मंगळवारी प्रत्येकी चार लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. नायब तहसीलदार आय.एम. कांबळे, मंडळ अधिकारी दिलीप गोळे, तलाठी घोडाम, एस.एस. रंगीनवार, मुन्ना पटेल, हरिभाऊ ढाकुलकर, दीपक ठवरे आदींच्या उपस्थितीत सुनीता सुधीर राठोड व प्रतिभा तुळशीदास राठोड यांना धनादेश देण्यात आला.