पोलिसाच्या खुनातील आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 09:42 AM2018-12-17T09:42:52+5:302018-12-17T09:43:16+5:30
मारेगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार राजेंद्र कुडमेथे यांच्या खुनातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
यवतमाळः मारेगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार राजेंद्र कुडमेथे यांच्या खुनातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी अनिल मेश्राम यांना झारी तालुक्यातील हिवरे गावी पांढरकवडा पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी गावकऱ्यांना धमक्याही देत होता. हा आरोपी गावात येऊन ‘अटक तर होणारच नाही, पोलिसांना आपण सापडूच शकत नाही, आणखी दोघे-तिघे आपल्या निशाण्यावर आहेत,’ अशा वल्गना करून गावकऱ्यांना अप्रत्यक्ष धमक्या देत होता.
सहायक फौजदार राजेंद्र कुडमेथे (रा. वणी) यांच्या खुनाच्या घटनेवरून (२५ नोव्हेंबरची मध्यरात्र) 21 दिवस लोटल्यानंतर या आरोपीला कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे. गेल्या दोन आठवड्यातील आरोपीच्या गावातील येरझारा पाहता तो दूर कुठे गेलेला नाही, गावाच्या आजूबाजूलाच कुठे तरी आहे, गुराखी असल्याने संपूर्ण जंगलाचा त्याला अभ्यास आहे, त्याचाच फायदा तो फरार राहण्यासाठी घेतो आहे, अशा निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले होते. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
हिवरीच्या परिसरात अनेक पोड आहेत. कदाचित तेथेच हा आरोपी आश्रय घेत असावा, असा संशय पोलिसांना होता. या आरोपीची गावात दहशत होती. त्यामुळे सामान्य नागरिकच नव्हे तर शासकीय घटकही पोलिसांना त्याच्याबाबत माहिती देणे टाळत होते, अखेर त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.