पुसद शहरात गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 09:59 PM2017-11-01T21:59:40+5:302017-11-01T21:59:52+5:30

दिवाळीपासून पुसद शहरात गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून नंबर लावल्यानंतर आठ दिवसानंतरही ग्राहकाला सिलिंडर मिळत नाही.

Artificial scarcity of gas cylinders in the Pusad city | पुसद शहरात गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई

पुसद शहरात गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई

Next
ठळक मुद्देकाळाबाजार : सिलिंडर न मिळता सबसिडी होते बँक खात्यात जमा

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : दिवाळीपासून पुसद शहरात गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून नंबर लावल्यानंतर आठ दिवसानंतरही ग्राहकाला सिलिंडर मिळत नाही. उलट अधिक पैसे मोजले तर सिलिंडर सहज उपलब्ध होते. यातून ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे.
पुसद शहरातील गॅस एजंसीमध्ये सर्रास पणे काळाबाजार सुरू आहे. सर्वसामान्य ग्राहकांना गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नाही. आठवड्यापेक्षा अधिक कालावधी प्रतीक्षेत जातो. अनेकदा ग्राहकांचा नंबर लागतो, बँक खात्यात सबसिडीही जमा होते. परंतु सिलिंडरचा मात्र पत्ता नाही. याचाच अर्थ गॅस सिलिंडरचे अधिक पैसे घेऊन काळ्याबाजारात विकले जाते. घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी असल्याचे कारण पुढे करून ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. नियम डावलणाºया विक्रेत्याकडून घरपोच सिलिंडरचा नियम आवर्जुन पाळला जात आहे. त्यानुसार वाहनातूनच ग्राहकांना घरपोच सिलिंडर दिले जात असल्याचे सांगितले जाते. तसे घडत असेल तर हॉटेल, टपरी आणि खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडे घरगुती सिलिंडर येतात कोठून हा प्रश्न निर्माण होतो. नियमानुसार नोंदणी केली तर संबंधित व्यक्ती गॅस सिलिंडरचा गैरवापर करते असा जावई शोध विक्रेत्यांनी लावल्याचे लक्षात येते. त्यामुळे कारवाईची धडक मोहीम झाली तर या काळाबाजारीमागील खरे सूत्रधार समोर येऊ शकतात. परंतु कारवाई कोण करणार हा प्रश्न आहे.
पुसद शहरात नाईक चौकाजवळ गॅस एजंसी आहे. शंकरनगरातील रहिवासी अग्रवाल यांनी २२ आॅक्टोबर रोजी सिलिंडरसाठी कंपनीकडे नंबर लावला. २३ आॅक्टोबर रोजी नंबर लागला. ६९२ रुपये भरा असा मॅसेज त्यांच्या मोबाईलवर आला. हा मॅसेज आल्यानंतर गॅस पुस्तक घेऊन ते एजंसीत गेले. त्यानंतर तुमचा सिलिंडर घरपोच येईल, असे सांगितले. परंतु चार दिवसानंतरही सिलिंडर आला नाही. या चार दिवसात अग्रवाल यांनी दोन-तीन वेळा चौकशी केली. परंतु दुकानातील कर्मचारी तुटवड्याचे कारण पुढे करीत होता. २७ आॅक्टोबरला तर कहरच केला. सिलिंडरची डिलीव्हरी झाली आहे, असा मॅसेज आला. परंतु सिलिंडर घरी पोहोचलेच नाही.
पुन्हा एकदा एजंसीत जाऊन चौकशी केली. तर गाडी निघाली आहे, घरी पोहोचेल असे सांगितले. त्यानंतरही चार दिवस सिलिंडर पोहोचले नाही. उलट ३० आॅक्टोबर रोजी त्यांच्या बँक खात्यात सबसिडीची रक्कम १८१.६७ पैसे जमा झाले. यानंतर पुन्हा गॅस एजंसी गाठली तेव्हा कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली.याचाच अर्थ या एजंसीत काम करणारे काही कर्मचारी सिलिंडरचा काळाबाजार करीत असल्याचे उघडकीस आले. ग्राहकाला सिलिंडर न देता ते दुसरीकडे अधिक पैशाने विकले जाते. शहरातील अनेक हॉटेल, टपरी आणि इतर व्यवसायात घरगुती सिलिंडरचा वापर होत आहे. परंतु यावर कुणाचाही वचक नाही.
पुरवठा विभागाचे दुर्लक्ष
गॅस सिलिंडरच्या वितरणावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी महसूलच्या पुरवठा विभागाची आहे.येथील तहसील कार्यालयात पुरवठा विभागाचे कार्यालय आहे. तेथे कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु शहरात सिलिंडरच्या काळाबाजाराची त्यांना कोणतीही कल्पना दिसत नाही. शहरात खुलेआम सिलिंडर विकले जात आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना हक्काचे सिलिंडर मिळत नाही. याबाबत अनेकदा नागरिकांनी तक्रारीही केल्या आहेत. परंतु पुरवठा विभाग अर्थपूर्ण मैत्रीतून या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे.

Web Title: Artificial scarcity of gas cylinders in the Pusad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.