छत्रपती महोत्सव ठरणार कृतिशील प्रबोधन
By admin | Published: February 15, 2017 02:55 AM2017-02-15T02:55:45+5:302017-02-15T02:55:45+5:30
महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळात १७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान छत्रपती महोत्सव होत आहे.
सार्वजनिक शिवजयंती समिती : शोभायात्रा, व्याख्यान, रक्तदान, कपडे वाटप
यवतमाळ : महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळात १७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान छत्रपती महोत्सव होत आहे. या महोत्सवात शोभायात्रा, इतिहास चित्रप्रदर्शन, व्याख्यान यासह विविध स्पर्धा, रक्तदान, नेत्रशस्त्रक्रिया शिबिर आणि पारधी बेड्यावरील कपडे, औषध वाटपाच्या उपक्रमातून कृतिशील प्रबोधन केले जाणार आहे.
सावर्जनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने मंगळवारी याबाबत पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली. १७ फेब्रुवारीला सायंकाळी समता मैदानावर पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री संजय देशमुख राहणार आहेत. प्रमुख पाहुणे डॉ. विकास आमटे, स्वागताध्यक्ष यशवंत राऊत उपस्थित राहतील. सकाळी पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिवसामान्यज्ञान स्पर्धा, शिवकाव्य स्पर्धा, शिवनिबंध स्पर्धा होणार आहे.१८ फेब्रुवारीला सायंकाळी समूह नृत्य स्पर्धा व करिअर मार्गदर्शन होईल.
१९ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता गार्डन रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास माल्यार्पण करून शिवमॅराथॉन स्पर्धा ‘रन फॉर शिवाजी’ आयोजित करण्यात आली आहे. ‘शिवकालीन इतिहास प्रदर्शना’चे उद्घाटन विधान परिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते होईल.
प्रमुख चौकांमध्ये रांगोळी स्पर्धा, राज्यस्तरीय कराटे स्पर्धा, रक्तदान शिबिर, शिव चित्रकला स्पर्धा होईल. सायंकाळी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे. त्यानंतर ‘सर्वोत्तम शासक छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर प्रसिद्ध वक्ते प्रवीण देशमुख यांचे व्याख्यान होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक जीवन पाटील राहतील.
२० फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर मोर्चे काढण्याची गरज पडली असती काय?’ या विषयावर प्रसिद्ध वक्ते अमोल मिटकरी यांचे व्याख्यान आहे. अध्यक्षस्थानी प्रा. वसंतराव पुरके, तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भावना गवळी उपस्थित राहतील. २१ फेब्रुवारीला तलाव फैलातील पारधी बेड्यावर वैद्यकीय शिबिर व कपडे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. २२ रोजी सकाळी डॉ. अनिल सरगर स्मृती प्रित्यर्थ विनामूल्य शस्त्रक्रिया शिबिर आयुर्वेदिक महाविद्यालयात होईल. २३ रोजी क्रांतीसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त सत्यपाल महाराजांचे शिष्य अक्षयपाल यांचे सत्यवाणी कीर्तन होणार आहे. वाघापूर येथील गाडगे महाराज चौकात हा कार्यक्रम होईल.
छत्रपती महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत महोत्सवाचे मुख्य संयोजक तथा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले, प्रवीण भोयर, यशवंत राऊत, योगीराज अरसोड, सुदर्शन बेले, दत्ता चांदोरे, किशोर परडखे, सुनिल कडू, संतोष देशमुख, विशाल चुटे, अंकुश वाकडे, सृष्टी दिवटे, श्वेता दिवटे, संतोष जगताप, श्वेता मेश्राम, ऋषी पवार आदींनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)
स्वरानंदनवन आणि करिअर मार्गदर्शन हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण राहणार आहे. १७ रोजी डॉ. विकास आमटे निर्मित ‘स्वरानंदवन’ हा १५० दिव्यांग कलाकारांचा आॅर्केस्ट्रा सादर होईल. १८ फेब्रुवारीला निवृत्त आयएएस अधिकारी नानासाहेब पाटील व डायटचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे करिअर मार्गदर्शन करतील. ‘मला आजचे शिवाजी महाराज व्हायचे आहे’ या विषयावर ते विद्यार्थ्यांना दिशा दाखवतील. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष पाटील, प्रमुख पाहुणे वसंतराव घुईखेडकर राहतील. महोत्सवात छत्रपती संभाजी राजे युवा पुरस्कार, राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब महिला पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज सामाजिक पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार वितरित केले जाणार आहे.