पती-पत्नीला हवी जवळजवळ नोकरी; बदलीसाठी चक्क गावांचे अंतरच बदलले, छाननीमध्ये उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 04:30 PM2022-12-16T16:30:37+5:302022-12-16T16:40:21+5:30
जिप शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या
यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, यात प्राधान्य मिळविण्यासाठी काही गुरुजींनी बराच घोळ केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. पती-पत्नी दोघेही शिक्षक असलेल्या लाभार्थ्यांनी एकमेकांच्या जवळ जवळ बदली मिळविण्यासाठी अंतराचे बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचे पुढे आले आहे. मात्र, छाननीमध्ये हा प्रकार चव्हाट्यावर आला असून, त्यांचे दावे रद्द करण्यात आले. परंतु, त्यानंतरही या शिक्षकांनी आता सीईओंकडे दाद मागितली आहे.
ऑनलाईन पोर्टलद्वारे ही प्रक्रिया राज्यस्तरावरून राबविली जात असली तरी आक्षेप घेण्याची सुविधा जिल्हास्तरावर देण्यात आली आहे. बदलीपात्र आणि बदली अधिकार प्राप्त अशा दोन हजार शिक्षकांची यादी पोर्टलद्वारे जाहीर झाली आहे. त्यात अनेकांनी संवर्ग एक आणि संवर्ग दोनचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आहेत. संवर्ग एकमध्ये दिव्यांग व दुर्धर आजारग्रस्त शिक्षकांचा समावेश आहे. तसेच संवर्ग दोनमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाची सुविधा मिळणार आहे.
शिक्षक असलेल्या ज्या पती-पत्नीच्या शाळांमधील अंतर ३० किलोमीटरपेक्षा अधिक आहे, त्यांना संवर्ग दोनमधून बदली प्रक्रियेत प्राधान्य मिळणार आहे. मात्र, हा लाभ घेण्यासाठी ज्यांच्या शाळेचे अंतर २५ किमी, २६ किमी आहे, त्यांनीही सार्वजनिक बांधकाम खात्यातील यंत्रणेशी ‘संवाद’ साधून ३० किमी अंतराचे प्रमाणपत्र मिळवून सादर केले आहे. अशा शिक्षकांच्या अर्जांवर इतर शिक्षकांनी आक्षेप घेतल्यानंतर ते अर्ज शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावर झालेल्या छाननीत रद्द करण्यात आले. परंतु, त्यांनी आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे.
बीडीओलाही बोलाविले
संवर्ग दोनमध्ये अनेक शिक्षकांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या कक्षात शुक्रवारी १६ डिसेंबरला या शिक्षकांची सुनावणी घेतली जाणार आहे. त्यासाठी पुसद, दारव्हा, झरी येथील शिक्षकांसह संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनाही सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी दिले.