प्रशासन बदलताच यवतमाळात क्रिकेट बुकींना मोकळे रान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 10:25 PM2022-11-10T22:25:11+5:302022-11-10T22:25:33+5:30
मध्यंतरीच्या काळात मोठे जुगार अड्डे, सट्टा, क्रिकेट बुकी जिल्ह्याबाहेर पळाले होते. आता मात्र पूरक वातावरण तयार होत असल्याने त्यांनी यवतमाळ शहरासह वणी व इतर भागात जम बसविला आहे. यामुळे यंदाचा आयपीएल हंगाम चांगलाच गाजला आहे. अनेक सुखवस्तू कुटुंबातील सदस्य क्रिकेट सट्ट्यात बरबाद झाले आहेत. त्यांच्याकडून वसुलीसाठी आता गावगुंडांचा वापर केला जात आहे. यातून गावगुंडांनाही रोजगार मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील मोठे अर्थकारण क्रिकेट सट्टा, जुगार अड्डे, अवैध सावकारी, भूखंड आणि तस्करी भोवती फिरते आहे. यातूनच अमाप पैशाची उलाढाल होते. हा पैसा सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे. यंदा आयपीएल हंगामात क्रिकेट बुकींना मोकळे रान मिळाले. प्रशासनात सोईस्करपणे बदल घडविला.
मध्यंतरीच्या काळात मोठे जुगार अड्डे, सट्टा, क्रिकेट बुकी जिल्ह्याबाहेर पळाले होते. आता मात्र पूरक वातावरण तयार होत असल्याने त्यांनी यवतमाळ शहरासह वणी व इतर भागात जम बसविला आहे. यामुळे यंदाचा आयपीएल हंगाम चांगलाच गाजला आहे. अनेक सुखवस्तू कुटुंबातील सदस्य क्रिकेट सट्ट्यात बरबाद झाले आहेत. त्यांच्याकडून वसुलीसाठी आता गावगुंडांचा वापर केला जात आहे. यातून गावगुंडांनाही रोजगार मिळाला आहे.
वसुलीतून गावगुंडांना दिला जातो रोजगार
जुगार क्लबही जोरात सुरू; आलिशान फार्म हाऊसवर लाखोंची उलाढाल
- दडपणाखाली मागील दोन वर्ष अवैध व्यवसाय सुरू होते. आता मोकळा हात चालवता येईल, अशी आशा सर्वांनाच लागली आहे. त्यामुळेच जोरकसपणे जुगार क्लब सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आठ दिवसांपूर्वी आलिशान फार्म हाऊसवर बुकी व जुगार क्लब भरविणाऱ्यांची जंगी बैठक झाली. दोन वर्षातील नुकसान भरुन काढायचे नियोजन करण्यात आले.
- सध्या आलिशान फार्म हाऊसवरील जुगार क्लब जोमात सुरू आहे. तेथे कुणीच फिरकणार नाही, याची शाश्वती मिळाली आहे. त्यामुळेच दिवसाला येथे कोट्यवधींची उलाढाल होते. शिवाय महानगरातून आंबटशौकिनांसाठी ललना देखील बोलविल्या जात आहे. हा गैरप्रकार एकदा चव्हाट्यावर आला. आता तिथे कुणी फिरकण्याची हिंमत करणार नाही. हा सर्व प्रकार थांबविण्याचे आव्हान नव्या प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.
कुंटणखान्यामुळे तरुणाई होतेय बरबाद
- मालमत्ता विषयक गुन्हे वाढले आहे. चोरीचे सत्रच सुरू आहे. याचे प्रमुख कारण व्यसनाधीनता व अल्पवयीनांना लागलेला कुंटणखान्याचा नाद आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे सध्या तरी दुर्लक्ष होत आहे. अनेक गुन्ह्यांचे मूळ येथून सुरू होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजनेची गरज आहे.