आसेगावची अंगणवाडी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:33 PM2017-12-28T23:33:49+5:302017-12-28T23:34:03+5:30
येथील अंगणवाडीची इमारत पूर्णत: जीर्ण झाली आहे. गावातील चिमुकल्यांसाठी ही इमारत मृत्यूचा पाश ठरू पाहात आहे. त्यानंतरही बाल विकास विभाग व ग्रामपंचायत परस्परांकडे जबाबदारी ढकलण्याचे काम करत आहे.
सुरज नौकरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव(देवी) : येथील अंगणवाडीची इमारत पूर्णत: जीर्ण झाली आहे. गावातील चिमुकल्यांसाठी ही इमारत मृत्यूचा पाश ठरू पाहात आहे. त्यानंतरही बाल विकास विभाग व ग्रामपंचायत परस्परांकडे जबाबदारी ढकलण्याचे काम करत आहे. अशा धोकादायक इमारतीत अंगणवाडीचे कामकाज सुरू असून स्थानिक प्रशासनाला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आसेगाव(देवी)त दोन अंगणवाड्या कार्यान्वित आहे. यातील एक अंगणवाडी गावाच्या वेशीबाहेर आहे, तर दुसरी अंगणवाडी गावातील शाळेच्या शेजारी आहे. मागील आठ वर्षांपासून या अंगणवाडीची इमारत धोकादायक स्थितीत आली आहे. इमारतीच्या भिंतीला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहे, तर घुशीने उकीर काढला असून बसण्याची सोय राहिलेली नाही. या अंगणवाडीच्या इमारतीत मुलांना बसविण्यात येऊ नये असे आदेश बाल विकास प्रकल्प अधिकाºयांनी दिले आहे. ही अंगणवाडी इतरत्र हलवावी, असे सांगण्यात आले आहे. शाळेच्या परिसरातच अंगणवाडीची जीर्ण इमारत असल्याने मुलं या धोकादायक इमारतीत खेळतात. सुटीचा काळ या परिसरातच त्यांचा जातो. अंगणवाडीची इमारत कधी कोसळेल याची शाश्वती नाही. मात्र या इमारतीला जमिनदोस्त करण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी कुठलाही प्रयत्न होताना दिसत नाही. मागील आठ वर्षांपासून केवळ पाठपुरावा सुरू आहे, असे ठेवणीतले उत्तर दिले जाते. स्थानिक लोकप्रतिनिधीही या समस्येबाबत गंभीर नाहीत. ग्रामपंचायतीने याठिकाणी नवीन इमारत करण्याचा अट्टहास केला आहे. याच परिसरात शाळेची खिचडी शिजविण्यात येते. तेथे प्रचंड घाण असताना हा शालेय पोषण आहार तयार होतो. या पोषण आहारातून मुलांना धोका उत्पन्न होऊ शकतो. गावाच्या बाहेर असलेल्या अंगणवाडी इमारतीत मुले दूर असल्याने जाण्यास तयार नाही. परिणामी शाळेच्या परिसरातच अंगणवाडी भरविली जाते. आता ही समस्या कधी निकालात निघते याची प्रतीक्षा आसेगावदेवीवासीयांना लागली आहे. याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रशांत विधाते यांना विचारणा केली असता त्यांनी अंगणवाडीच्या इमारतीत मुलांना बसवू नये, असा आदेश दिला आहे. ही इमारत दुरुस्त करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. त्यांच्यास्तरावर याबाबत कारवाई व्हावी, असे त्यांनी सांगितले. या टोलवाटोलवीतच ही धोकादायक इमारत कायम आहे.