यवतमाळ जिल्ह्यातील झरीत आढळले अश्मयुगीन शिळावर्तुळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 11:27 AM2019-06-29T11:27:24+5:302019-06-29T11:31:36+5:30
जिल्ह्यातील दुर्गम जंगलव्याप्त झरीजामणी परिसरात दोन प्राचीन शिळावर्तुळे आढळली आहेत. या शिळावर्तुळांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये अश्मयुगीन इतिहासाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील दुर्गम जंगलव्याप्त झरीजामणी परिसरात दोन प्राचीन शिळावर्तुळे आढळली आहेत. या शिळावर्तुळांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये अश्मयुगीन इतिहासाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पुरातत्व खात्याने या भागात संशोधन करण्याची गरज आहे.
झरी तालुक्यातील माथार्जुन शिवारात ही शिळावर्तुळे आढळली. पांढरकवडा येथील शिक्षक विजय गोडे यांनी शिळावर्तुळांची छायाचित्रे घेऊन पुरातत्व खात्याशी संपर्क साधला आहे. माथार्जुन परिसरात येऊन संशोधन करावे, अशी मागणीही केली आहे.
महाराष्ट्रात शिळावर्तुळे आढळण्याचे प्रकार यापूर्वीही घडले. नागपूर, पुणे, सिंधुदुर्ग आदी परिसरासह कर्नाटकातही शिळावर्तुळे यापूर्वी सापडली. मात्र यवतमाळ जिल्ह्यात पहिल्यांदाच हा प्रकार पुढे आला आहे. माथार्जुन शिवारात आढळलेल्या दोन्ही शिळावर्तुळांची त्रिज्या साधारण १५ ते २० फुटांची आहे. गेल्या वर्षीच २०१८ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर, घुमडे या गावात अशीच शिळावर्तुळे आढळली.
अश्मयुगीन अंधश्रद्धेची प्रथा
अश्मयुगीन कालखंडात शिळावर्तुळांची प्रथा होती. एखाद्या इसमाचा मृत्यू झाल्यावर त्याचा मृतदेह पुरल्यानंतर सभोवती विशिष्ट आकारातील दगडांचे वर्तुळ करण्याची ही प्रथा होती. त्यामागे काहीशी अंधश्रद्धाही असल्याचे सांगितले जाते. मृत व्यक्तीचा पुनर्जन्म होईल आणि पुनर्जन्म होताच त्याला त्याच्या आवडीच्या वस्तू मिळाव्या या उद्देशाने ही शिळावर्तुळे केली जात होती. मृत व्यक्ती राजा असेल तर मोठ्या आकाराच्या शिळा वापरल्या जायच्या. लहान मूल असेल तर छोटे दगड वापरले जायचे, अशी माहिती पुरातत्व खात्याच्या एका सहसंचालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
शिळावर्तुळ म्हणजे काय ?
प्रेत दफन केल्यानंतर मृत व्यक्तीच्या आवडीच्या वस्तू मध्यभागी ठेऊन सभोवताल दगडांचे वर्तुळ केले जाते. हे दगड मोठे आणि विशिष्ट आकारातील आढळतात. शिवाय विशिष्ट अंतर ठेऊन दगडांची सलग रचना शिळावर्तुळात आढळते. अश्मयुगीन कालखंडात हा प्रकार केला जात होता, असे सांगितले जात होते. आता माथार्जुन परिसरात आढळलेली शिळावर्तुळांचा व्यास यापूर्वी आढळलेल्या वर्तुळांपेक्षा मोठा आहे. येथे संशोधन झाल्यास अश्मयुगीन कालखंडाच्या खाणाखुणा सापडण्याची शक्यता आहे.
सध्या पीक नसल्यामुळे आणि जंगलही काहीसे निष्पर्ण असल्यामुळे ही शिळावर्तुळे मला सहज दिसली. उत्सुकतेपोटी पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना त्याची छायाचित्रे पाठवून संशोधनाची मागणी केली आहे.
- विजय गोडे
शिक्षक, पांढरकवडा
हे प्रकार पाषाणयुगातील असू शकतात. आमची प्री-हिस्ट्री ब्रँच अशा संशोधनासाठी सतत फिरत असते. संबंधित गावकऱ्यांनी तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी केल्यास आमची चमू माथार्जुनमध्ये प्रत्यक्ष अभ्यास करेल.
- प्रशांत शिंदे,
वरिष्ठ संरक्षण सहायक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षक विभाग, चंद्रपूर उपमंडळ