अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या विदर्भावरून ! दुर्बिणीशिवाय अनेकांनी अनुभवला ऐतिहासिक क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 11:40 IST2025-03-12T11:39:13+5:302025-03-12T11:40:13+5:30

दिसले अंतराळस्थानक : सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतण्याची उत्सुकता

Astronaut Sunita Williams passed through Vidarbha! Many experienced the historic moment without telescopes | अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या विदर्भावरून ! दुर्बिणीशिवाय अनेकांनी अनुभवला ऐतिहासिक क्षण

Astronaut Sunita Williams passed through Vidarbha! Many experienced the historic moment without telescopes

विशाल सोनटक्के 
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
मंगळवारची सायंकाळ खगोलप्रेमींसाठी विशेष ठरली. आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक (आयएसएस) पाहण्याची अनोखी संधी विदर्भवासीयांना मिळाली. सायंकाळी ७:१२:५९ वाजता पश्चिम दिशेच्या डाव्या बाजूने या स्थानकाने विदर्भाच्या अवकाशात प्रवेश केला आणि ७:१९:१० वाजताच्या सुमारास उत्तर दिशेच्या उजवीकडून ते पुढे वेगाने निघून गेले. जाताना हे अवकाशस्थानक पांढऱ्या बिंदूप्रमाणे चमकताना दिसले. विशेष म्हणजे भारतीय वंशाची अमेरिकन शास्त्रज्ञ अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या परतीची प्रक्रिया बुधवार, १२ मार्चपासून सुरू होणार असल्याने विदर्भाच्या आकाशातून प्रवास करण्याची विल्यम्स यांची ही बहुधा शेवटची फेरी असेल. कोणत्याही दुर्बिणीशिवाय आपल्या घराच्या गच्चीतून थेट आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक पाहण्याचा योग विदर्भवासीयांना यानिमित्ताने अनुभवता आला. या अवकाशस्थानकात भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर अडकून पडले आहेत.


अनेक ठिकाणांहून दिसले स्थानक
मंगळवारी सायंकाळी ०७:०० वाजून १२ मिनिटांनी यवतमाळ येथून हे आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक आकाशात दिसले. ०७:०० वाजून १९ मिनिटांपर्यंत यवतमाळकरांसह २०० कि.मी. परिसरातील नागरिकांना ते पाहता आले. याबरोबरच वर्धा, वाशिम, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, तसेच भंडारा आदी जिल्ह्यांतील खगोलप्रेमींनीही हे स्थानक पाहण्याचा अनुभव घेतला. येथून पुढच्या प्रवासात सुनीता विल्यम्स या स्थानकात नसतील. मात्र, नव्याने आलेल्या नासाच्या सहकाऱ्यांसोबत या स्थानकाचा प्रवास सुरू राहील.


सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतण्याची उत्सुकता
गतवर्षी जून महिन्यात ८ दिवसांच्या मोहिमेसाठी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात गेले होते; परंतु तांत्रिक समस्येमुळे ते अंतराळस्थानकावरच अडकून पडले. त्यांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न 'नासा'कडून सुरू होते. आता ही प्रतीक्षा संपणार आहे. स्पेस एक्सचे कू १० मिशन बुधवार, दि.१२ मार्च रोजी प्रक्षेपित होईल. त्यानंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या अंतराळवीरांची जागा नासाचे दुसरे अंतराळवीर घेऊन विल्यम्स आणि विल्मोर हे दोघे परततील. नवे सहकारी आयएसएसवर सहा महिन्यांच्या मोहिमेसाठी राहणार असल्याचे नासाने म्हटले आहे.


"प्रत्येकवेळी आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक वरून जाताना पाहण्यासाठी अचूक वेळ मिळणे आवश्यक असते. त्यातच यावेळी सायंकाळची वेळ असल्याने यवतमाळकरांना हा क्षण अनुभवता आला. या स्थानकाची पृष्ठभागापासूनची उंची ४२१ कि.मी. तर गती ७.६६ कि.मी. प्रतिसेकंद इतकी असावी, हे अवकाशस्थानक यवतमाळ शहराभोवतालच्या २०० कि.मी. परिसरातून दुर्बिणीशिवाय साध्या डोळ्याने दिसले."
- रवींद्र खराबे, खगोल अभ्यासक

Web Title: Astronaut Sunita Williams passed through Vidarbha! Many experienced the historic moment without telescopes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.