विद्यार्थ्यांच्या खगोल ज्ञानात भर घालणारा तारांगण प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2022 05:00 AM2022-02-27T05:00:00+5:302022-02-27T05:00:02+5:30
नगरपरिषदेने नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत साडेतीन कोटी रुपये खर्चून हा तारांगण प्रकल्प साकारला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही काही दिवस तांत्रिक बाबीमुळे तो सुरू झाला नव्हता. आता हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लहान मुलांनाच नव्हे तर प्रौढांच्या ज्ञानातही भर घालणारा हा प्रकल्प आहे. आभासी विश्वात नेऊन एक प्रकारे अंतराळाची सैर घडवून आणल्याचा भास होतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ग्रामीण विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना व संशोधकांना अंतराळात घडणाऱ्या घडामोडींची प्राथमिक माहिती तारांगण प्रकल्पातून दिली जात आहे. तारांगणामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या खगोलीय ज्ञानात भर पडणार आहे. यासाठी हा प्रकल्प अतिशय उपयुक्त असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सांगितले. शनिवारी सकाळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत तारांगणाचा पहिला शो सादर झाला व त्या माध्यमातून औपचारिक लोकार्पण करण्यात आले.
नगरपरिषदेने नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत साडेतीन कोटी रुपये खर्चून हा तारांगण प्रकल्प साकारला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही काही दिवस तांत्रिक बाबीमुळे तो सुरू झाला नव्हता. कोरोनाच्या मर्यादा असल्याने हे काम रखडले होते. आता हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, प्रशासक तथा मुख्याधिकारी माधुरी मडावी, अभियंता विनय देशमुख, डॉ. विजय अग्रवाल आदी उपस्थित होते. तारांगणातून अंतराळाबाबतची शास्त्रीय माहिती देण्यात येते. लहान मुलांनाच नव्हे तर प्रौढांच्या ज्ञानातही भर घालणारा हा प्रकल्प आहे. आभासी विश्वात नेऊन एक प्रकारे अंतराळाची सैर घडवून आणल्याचा भास होतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
तासाभरात ब्रम्हांडाचा फेरा मारल्याचा होतो भास
- येथील आसन व्यवस्था, ध्वनी व्यवस्था व स्लाईड शोचे नियोजन अतिशय योग्य असल्याने तासाभरात ब्रम्हांडाचा फेरा मारल्याचा भास होतो. अद्भुत व अगाध असलेल्या अंतराळाबद्दल अनेक महत्त्वपूर्ण बाबींची माहिती या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. खऱ्या अर्थाने ही जिल्ह्यासाठीच उपलब्धी ठरणार आहे. शिवाय नगरपरिषदेने नेहरू उद्यानाचेही सुशोभीकरण करून तेथे खेळणे बसविले आहे. परिसर सुंदर असल्याने यवतमाळकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.