जुनोनीचा अतुल बनला विक्रीकर निरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 01:34 AM2017-12-24T01:34:24+5:302017-12-24T01:34:39+5:30
प्रतिकूल परिस्थितीवर कठोर परिश्रमाने मात करून तालुक्यातील जुनोनी या आडवळणावरच्या गावातील अतुल प्रभाकर वानखडे याने स्पर्धा परीक्षेचे लक्ष भेदून विक्रीकर निरीक्षक म्हणून शासकीय सेवेत नोकरी मिळविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : प्रतिकूल परिस्थितीवर कठोर परिश्रमाने मात करून तालुक्यातील जुनोनी या आडवळणावरच्या गावातील अतुल प्रभाकर वानखडे याने स्पर्धा परीक्षेचे लक्ष भेदून विक्रीकर निरीक्षक म्हणून शासकीय सेवेत नोकरी मिळविली आहे.
अतुल अगदी सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचे वडील प्रभाकर वानखडे हे रात्रंदिवस राबून मुलाच्या शैक्षणिक भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न करीत होते. प्रचंड आर्थिक मर्यादा असल्याने अतुल पुढे अनेक अडचणी होत्या. पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण त्याने जुनोना येथील शाळेत तर पाचवी ते दहावी पर्यंत पारवेकर विद्यालय आणि ११ ते १२ वी घाटंजीच्या एसपीएम विद्यालयातून उत्तीर्ण केले. पुढील पदवीचे शिक्षण अभियांत्रिकीतून करण्याची इच्छा असतांनाही केवळ आर्थिक स्थिती नसल्याने अतुलने डीटीएड् केले. सोबतच मुक्त विद्यापीठाने बी.ए.ची पदवी घेतली. सीईटीची तयारी करण्यासाठी यवतमाळला आल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेला प्राधान्य दिले. यात त्याला प्रफुल्ल भोयर, आशिष रिंगोले, विवेक वाईकर, विवेक चुनारकर यांचे सहकार्य मिळाले. त्याने पहिल्याच प्रयत्नात एसटीआय २०१५ ची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली. नंतर आईची प्रकृती बिघडल्याने त्याला आपल्या प्रयत्न थांबवून आईच्या प्रकृतीसाठी वेळ द्यावा लागला. यात तीन ते चार महिन्याचा वेळ गेला. शेवटच्या टप्प्यात अंतिम परीक्षेची तयारी केली. यात १ गुणाने त्याची संधी हुकली. त्यानंतर एमपीएससीची जाहीरात निघाली नाही. याकालावधीत त्याने पुन्हा जोमाने अभ्यास सुरु केला. २९ जानेवारी २०१७ लाख पुन्हा पूर्व परीक्षा दिली. व ३ जूनच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला. याचा निकाल १४ डिसेंबरला लागला. खुल्या प्रवर्गातून अतुलची विक्रीकर निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. अतुलचे हे यश पाहण्यापूर्वी त्याच्या आईचे निधन झाले याची खंत त्याच्या मनात कायम आहे. अतुलने यशाचे श्रेय आई व काकूला दिले. शिवाय स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रफुल्ल भोयर, महेश पाटील, अभिजीत राठोड यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचे सांगितले. स्पर्धा परीक्षा अनिश्चिततेच क्षेत्र आहे. चिकाटी व कठोर परिश्रमात सातत्य या आधारावर यश नक्की मिळत असल्याचा विश्वास अतुलने व्यक्त केला.