ग्रामीण भागाला ‘एटीएम’ बंदचा फटका
By admin | Published: May 3, 2017 12:21 AM2017-05-03T00:21:27+5:302017-05-03T00:21:27+5:30
ग्राहकांना वेळेवर त्यांचे पैसे उपलब्ध व्हावे, बँकांच्या रांगामध्ये उभे राहण्याचा वेळ वाचावा, यासाठी आता
सलग सुट्यांचा परिणाम : नागरिकांना सहन करावा लागतो मनस्ताप
पोफाळी : ग्राहकांना वेळेवर त्यांचे पैसे उपलब्ध व्हावे, बँकांच्या रांगामध्ये उभे राहण्याचा वेळ वाचावा, यासाठी आता ठिकठिकाणी एटीएमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु संबंधित बँकांकडून व वेळेवर सेवा मिळत नसल्याने ग्रामीण भागातील एटीएममध्ये सदैव नोटा नसतात. त्यामुळे एटीएम बंद असते. नागरिकांना विनाकारण येरझारा माराव्या लागतात. यामुळे शासनाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जात आहे.
लागोपाठ आलेल्या सुट्या, बँकांमध्ये पैशाची कमतरता व बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे उदासीन धोरण यामुळे पोफाळी परिसरातील एटीएम अनेक दिवसांपासून बंद होते. त्यामुळे नागरिक त्रस्त होते. एटीएमच्या भरोशावर गावखेड्यातून येणाऱ्या नागरिकांची कामेच झाली नाही. त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. या संदर्भात काही नागरिकांनी थेट बँकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सलग आलेल्या सुट्यांमुळे ते शक्य होऊ शकले नाही.
बहुतांश एटीएमच्या समोर बंदचा फलक लोंबकळताना पाहून नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत होता. (वार्ताहर)