महागावात एटीएम मशीनच पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 04:04 AM2021-06-12T04:04:59+5:302021-06-12T04:04:59+5:30
महागाव : शहरातील वसंतराव नाईक चौकातील इंडियन कंपनीचे एटीएम मशीन चोरट्यांनी पळविले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. राजू ...
महागाव : शहरातील वसंतराव नाईक चौकातील इंडियन कंपनीचे एटीएम मशीन चोरट्यांनी पळविले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. राजू नरवाडे यांनी या घटनेची माहिती इंडियन कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.
नागपूर-तुळजापूर महामार्गावर शहरातील स्टेट बँक रोडवरील वसंतराव नाईक चौकात युनियन बँक, स्टेट बँक आणि इंडियन बँकेचे एटीएम मशीन लागलेले आहे. या एकाच चौकात तीन बँकेचे एटीएम असल्यामुळे या परिसरात नेहमी वर्दळ असते. स्टेट बँक व इंडियन बँकेच्या एटीएमजवळ रात्री पहारेकरी नसल्याची माहिती आहे. तेथील सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बंद आहे.
पोलिसांच्या रात्र गस्तीसाठी युनियन बँकेमध्ये नोंदीची डायरी आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून याठिकाणी कोणीही भेट दिली नसल्याची माहिती युनियन बँकेच्या सूत्रांनी दिली.
आता इंडियन बँकेचे एटीएम मशीन पळविल्याने पोलिसांच्या रात्र गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पळविण्यात आलेल्या एटीएममध्ये नेमकी किती रक्कम होती, हे अधिकाऱ्यांच्या फिर्यादी नंतर समोर येणार आहे. मात्र, या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. एटीएम मशीन पळविणाऱ्या टोळीने पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
कोट
इंडियन कंपनीची एटीएम मशीन पळवले बाबत पोलीस ठाण्यात अद्याप कुणाचीही फिर्याद दाखल झाली नाही. फिर्यादी नंतर त्वरित तपासातून सत्य काय ते निष्पन्न करू.
बालाजी शिंगेपल्लू
सहाय्यक पोलीस निरीक्षक, महागाव