यवतमाळ जिल्ह्यातील वनक्षेत्रावर ‘निपस स्केलटनायझर’चे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:30 PM2018-07-30T12:30:11+5:302018-07-30T12:31:42+5:30
जिल्ह्यातील वनक्षेत्रावर ‘निपस स्केलटनायझर’चे आक्रमण झाले आहे. या किडीने एक लाख हेक्टर वनक्षेत्र काबीज केलाचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे झाडाची वाढ खुंटण्याचा धोका आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील वनक्षेत्रावर ‘निपस स्केलटनायझर’चे आक्रमण झाले आहे. या किडीने एक लाख हेक्टर वनक्षेत्र काबीज केलाचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे झाडाची वाढ खुंटण्याचा धोका आहे.
तीन ते चार वर्षांपासून अज्ञात किडीने सागाच्या वृक्षावर आक्रमण केले आहे. कीटकशास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन केले आहे. ‘निपस स्केलटनायझर’ नावाची कीड या वृक्षांवरील पान फस्त करीत आहे. दमट वातावरणात ही कीड झपाट्याने पसरते. यावर्षी सतत ढगाळ वातावरण असल्याने एक लाख हेक्टरवर क्षेत्र काबीज केल्याचा अंदाज वन विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.
जिल्ह्यात पावणे तीन लाख हेक्टरवर सागाची वनसंपदा आहे. यातील ३० टक्के क्षेत्र या कीडीने काबीज केले आहे. विशेष म्हणजे, ही कीड चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नंदुरबार यासह अनेक भागात दृष्टीस पडली आहे.
या वृक्षांवर फवारणी करायची झाली तर विमानाच्याच मदतीने फवारणी करावी लागते. ते आपल्याकडे शक्य नाही. या किडीवर मात करणारे ‘बॅसिलस’ नावाचे बॅक्टेरिया कीटक शास्त्रज्ञानी विकसित केले आहे. मात्र त्यासाठी करावी लागणारी फवारणी उंच वृक्षांमुळे अशक्य आहे. छोट्या रोपांवर ही कीड आली होती. त्यावर औषधांच्या फवारणीमधून नियंत्रण मिळाले आहे. मात्र इतर ठिकाणी फवारणी शक्य नाही.
पानांची चाळणी
ही कीड सागाच्या झाडाचे संपूर्ण पान खाऊन टाकते. ढगाळ वातावरणात मोठ्या प्रमाणात प्रजनन होते. यामुळे काही दिवसातच सागाचे हिरवेकंच वृक्ष उन्हाळ्याप्रमाणे निष्पर्ण दिसतात. कीडीमुुळे झाडाची प्रकाश संस्लेषण क्रिया थांबली आहे. यामुळे झाडाची वाढ आणि गोलाई प्रभावित होण्याचा धोका आहे.
कीटक शास्त्रज्ञांकडून पाहणी
साग वृक्ष अचानक वाळत असल्याची बाब वन विभागाने वरिष्ठांना कळविली आहे. खबरदारी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटक शास्त्रज्ञ मगर यांच्या नेतृत्वात पाहणी करण्यात आली. त्यांनी उपाययोजना सूचविल्या, अशी माहिती उपमुख्य वनसंरक्षक भानुदास पिंगळे यांनी ‘लोकमत’ला दिली.