जालन्याच्या घटनेचे यवतमाळात उमटले पडसाद, मराठा आरक्षण समर्थक आक्रमक
By सुरेंद्र राऊत | Published: September 2, 2023 04:32 PM2023-09-02T16:32:04+5:302023-09-02T16:36:12+5:30
बसस्थानक चौकात रास्ता रोको, जिल्हा कचेरीवर धडक
यवतमाळ : जालना येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदाेलन सुरू आहे. या आंदोलकांवर अमानुष लाठीमार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत आहे. यवतमाळातीलमराठा आरक्षण समर्थकांनीही आक्रमक पवित्रा घेत बसस्थानक चौकात शनिवारी दुपारी रास्ता रोको केला. नंतर जिल्हा कचेरीवर धडक दिली. तेथे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला.
जालना येथे १ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी मराठा समाजातील महिला, वृद्ध, मुले मोठ्या संख्येने यात सहभागी झाले. हे आंदोलन दडपण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पोलिसांकडून हल्ला केला. आंदोलकांवर लाठ्या बरसविल्या. यात अनेकजण गंभीर जखमी झाले. या आंदोलनामुळे मराठा समाजात असंतोषाची लाट निर्माणझाली. यवतमाळातही मराठा समर्थकांनी रस्त्यावर उतरुन घटनेचा निषेध केला. सर्व प्रथम बसस्थानक चौकात रास्ता रोको केला. नंतर जिल्हा कचेरीवर धडक दिली. तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलिसांची आंदोलकांशी झटापट झाली. आंदोलकाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून जालना घटनेतील दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी केली.
या आंदोलनात सकल मराठा समाज, मराठा सेवा संघ, सर्व शाखेय कुणबी मराठा समाज, अखिल भारतीय मराठा महासंघ, आव्हान सामाजिक संघटना, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, प्रहार संघटना, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, दादा क्रीडा मंडळ, छत्रपती सेवा प्रतिष्ठान या सामाजिक संघटनांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.