किर्गिस्तानमध्ये हल्ले; यवतमाळ जिल्ह्यातून गेलल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत
By सुरेंद्र राऊत | Published: May 20, 2024 04:17 PM2024-05-20T16:17:45+5:302024-05-20T16:18:30+5:30
वैद्यकीय शिक्षणासाठी वास्तव्य : वंदे भारत मिशन राबविण्याची आर्जव
यवतमाळ : भारतातील वैद्यकीय शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने सामान्य कुटुंबातील मुल ज्या देशात कमी खर्चात शिक्षण मिळते, तेथे प्रवेश घेतात. किर्गिस्तान येथे वैद्यकीय शिक्षण अतिशय कमी शुल्क आकारून दिले जाते. त्यामुळे भारतातील बहुतांश राज्यातून मुले-मुली माेठ्या संख्येने किर्गिस्तान येथे जातात. आता या देशात अंतर्गत बंडाळी उठली असून विदेशी विद्यार्थी व नागरिकांवर हल्ले केले जात आहे. यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
किर्गिस्तान देशाच्या राजधानीचे शहर बिस्टेक येथे वैद्यकीय शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. १३ मेपासून या शहरात अनागोंदी सुरू झाली असून जवळपास चार हजार नागरिकांच्या जमावाने विदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला चढविला आहे. यात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे हे विद्यार्थी भयभीत झाले आहे. ते सातत्याने भारतातील पालकांच्या संपर्कात आहेत. काहीही करून आम्हाला मायदेशी परत आणा अशी आर्जव ते पालकांना करू लागले आहेत. मुलांच्या चिंतेपोटी पालकांच्या पोटातही भीतीचा गोळा उठला आहे.