जनावरांचा ट्रक पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न

By admin | Published: May 9, 2017 01:24 AM2017-05-09T01:24:37+5:302017-05-09T01:24:37+5:30

जनावरांनी भरलेला ट्रक अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस पथकाला दोनदा चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची ..

Attempt to put cattle truck under police control | जनावरांचा ट्रक पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न

जनावरांचा ट्रक पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न

Next

तस्कर फरार : सिनेस्टाईल पाठलाग, वणी-चारगाव मार्गावरील घटना, खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : जनावरांनी भरलेला ट्रक अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस पथकाला दोनदा चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी मध्यरात्री येथील वणी चारगाव मार्गावर घडली. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ट्रक पकडला खरा; परंतु ट्रकचालक, वाहक वाहक व त्यांचे काही साथिदार वाहन सोडून फरार होण्यात यशस्वी झालेत. या प्रकरणी वणी पोलिसांनी ट्रक चालक व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी रात्री वरोरा मार्गाने वणीकडे जनावराने भरलेले तीन ट्रक येत असल्याची माहिती यवतमाळ येथील नियंत्रण कक्ष व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून वणी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच, ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी डी.बी.पथक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाला सोबत घेऊन वरोरा मार्गावर सापळा रचला. रात्री १०.४० वाजताच्या सुमारास पाटाळाडून एक भरधाव ट्रक येत असल्याचे पोलिसांना दिसताच, पोलिसांनी सदर ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने पोलिसांच्या वाहनावर ट्रक चढविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस जीप चालकाने प्रसंगावधान राखून आपल्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या कडेला घेतले. त्यानंतर सदर ट्रकचा पाठलाग सुरू केला. जनावराने भरलेल्या या ट्रकच्या चालकाने आपला ट्रक टोल नाक्याकडे वळवून नाक्यावरील बॅरिकेट्स तोडून पुढे निघाला. यासंदर्भात लगेच शिरपूर पोलिसांना माहिती देऊन चारगाव येथे नाकाबंदी करण्याची सूचना करण्यात आली. मात्र चारगाव येथील नाकाबंदीलाही हुलकावणी देऊन ट्रक घुग्घूसकडे निघाला. त्यानंतर घुग्घूस पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. माहिती मिळताच, घुग्घूस पोलिसांनी रेल्वेगेट बंद करून नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केला असता, ट्रक चालकाने पुन्हा ट्रक मागे वळविला व वर्धा नदीच्या पुलाजवळ असलेल्या कुबेर वर्मा यांच्या वाहनांच्या पार्कींगमध्ये ट्रक नेऊन उभा केला. त्यानंतर ट्रकचालकासह ट्रकमधील पाच ते सहा जणांनी ट्रक तेथेच सोडून पोबारा केला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश निर्मल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि ३०७, ३४ सहकलम ११(१) (घ), (ड) (झ) प्राणी संरक्षक कायदा कलम ५ (अ) (ब) प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देणे कायदा कलम ८३/१७७,१३२/१७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सदर ट्रक ताब्यात घेतला असून त्यातील १९ जनावरांना रासा येथील संस्कार माऊली गोरक्षणमध्ये ठेवण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मुकुंद कुळकर्णी, पोलीस उपनिरीक्षक जयप्र्रकाश निर्मल, जमादार सुदर्शन वानोळे, नायक पोलीस सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, सुनिल कुंटावार, पोलीस शिपायी दिलीप जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे ईकबाल शेख, महेंद्र भुते, आशिष टेकाडे, वाहन चालक प्रशांत आडे यांनी पार पाडली.

ट्रक मालकाचा शोध सुरू, आरटीओला लिहीले पत्र
जनावर तस्करीचे तार नागपुरात जुळले असल्याची बाब सर्वश्रुत आहे. नागपुरातून ही जनावरे थेट हैैद्राबाद येथे कत्तलीसाठी नेली जात आहे. रविवारी रात्री जप्त करण्यात आलेला ट्रकही नागपूर येथीलच असल्याची माहिती असली तरी सदर ट्रक नेमका कुणाच्या मालकीचा आहे, याचा शोध वणी पोलीस घेत आहेत. यासंदर्भात ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी परिवहन विभागाला पत्र लिहीले असून सदर ट्रक संदर्भात माहिती मागविली आहे.

Web Title: Attempt to put cattle truck under police control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.