पंचायत समितीच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:31 AM2021-07-17T04:31:26+5:302021-07-17T04:31:26+5:30
पुसद : येथील पंचायत समितीच्या प्रांगणात तालुक्यातील बोरगडी येथील ओमप्रकाश शिंदे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी दुपारी ...
पुसद : येथील पंचायत समितीच्या प्रांगणात तालुक्यातील बोरगडी येथील ओमप्रकाश शिंदे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.
बोरगडी ग्रामपंचायत सदस्य सीमा खडसे यांच्या घरी शौचालय बांधलेले नाही. तरीही ग्रामसेवकाने त्यांना शौचालय असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यावरून खडसे यांनी निवडणूक लढविली. याची चौकशी व्हावी आणि मागितलेली माहिती द्यावी, अशी मागणी संतोष भालेराव, बाबासाहेब शिंदे, ओमप्रकाश शिंदे यांनी बोरगडी सरपंच व सचिवांकडे केली होती. मात्र, सचिवाने माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ओमप्रकाश शिंदे यांनी पंचायत समितीच्या वरिष्ठांशी संपर्क साधून माहिती देण्यात यावी, अशी विनंती केली. दरम्यान, सचिवांनी गटविकास आधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मागितले होते.
शुक्रवारी या गोष्टीला तब्बल १२ दिवस लोटले. तरीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे ओमप्रकाश शिंदे यांनी पंचायत समितीत सभा सुरू असताना अंगावर रॉकेल ओतून सभागृहासमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सहायक गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ पाच लोकांची समिती नेमून एका तासात अहवाल देऊन योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.