गुप्तधनाच्या मोहापायी पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीसह सासरची मंडळी फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 10:13 AM2022-06-06T10:13:19+5:302022-06-06T10:19:19+5:30
केळापूर येथील एका व्यक्तीने गुप्त धनाच्या मोहापायी आपल्याच पत्नीचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पांढरकवडा (यवतमाळ) : एका महिलेच्या पतीला गुप्तधन शोधण्याचे वेड लागले. अघोरी विद्येद्वारे गुप्तधन काढण्याच्या मोहात त्याने चक्क आपल्याच पत्नीवर अनेक मांत्रिक प्रयोग केले. तिला अंगारा लावणे, हार टाकणे व जडीबुटीचे औषध देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातून ती कशीबशी वाचली आणि तिने पोलीस ठाण्याचा रस्ता धरला. ही कहानी आहे येथून जवळच असलेल्या केळापूर येथील एका पीडित महिलेची.
२१व्या शतकातही गुप्तधनासाठी अघोरी विद्येद्वारे अंधश्रद्धेतून असे प्रकार घडत आहेत. समाजातून अद्यापही अंधश्रद्धेचे निर्मूलन झाले नाही, याचे हे उदाहरण आहे. केळापूर येथील एका इसमाने आपल्याच पत्नीचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पती व सासरच्या मंडळींकडून केला जात असलेला मानसिक व शारीरिक छळ असह्य झाल्याने अखेर पीडितेने शुक्रवारी पांढरकवडा पोलीस ठाण्यात आपल्या पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध रीतसर फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी पीडित ही आर्णी तालुक्यातील भंडारी (शिवर) या गावाची मूळ रहिवासी असून तिचा विवाह १० वर्षांपूर्वी केळापूर येथील प्रवीण गोविंदराव शेगर याच्यासोबत झाला. लग्नानंतर एक ते दीड वर्ष पीडितेला सासरच्या मंडळींकडून चांगली वागणूक देण्यात आली. परंतु नंतर तिला माहेरवरून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. पीडितेला मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू झाल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यानच्या काळात तिच्या पतीला व सासरच्या मंडळीला गुप्तधन शोधण्याचे वेड लागले. अघोरी विद्येद्वारे गुप्तधन काढण्याच्या मोहात पतीसह सासरच्या मंडळीने अनेक वेळा पीडितेवर मांत्रिक प्रयोग केले. गुप्तधन शोधण्याच्या मोहापायी पीडितेला अंगारा लावणे, हार टाकणे व जडीबुटीचे औषध देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रारीद्वारे कथन केला. या प्रकाराला विरोध केला असता, तिला अधिकच त्रास दिला जात होता.
दिवसेंदिवस हा छळ जास्तच वाढत चालल्याने पीडितेने हा सर्व प्रकार आपल्या माहेरी आई-वडिलांना सांगितला. माहेरच्या लोकांनी केळापूरला येऊन तिला लगेच माहेरी नेले. शुक्रवारी ३ जून रोजी पती प्रवीण शेगर याच्यासह सासरे, सासू, नणंद, नंदोई विरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, पीडितेचा पती व सासरची मंडळी फरार झाली आहेत.
पीडितेची तक्रार ३ जून रोजी प्राप्त झाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. फिर्यादीचे बयाण घेण्याकरिता तिला पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.
- जगदीश मंडलवार, पोलीस निरीक्षक पांढरकवडा