पैनगंगा नदी पात्रात आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:37 PM2018-11-30T23:37:44+5:302018-11-30T23:39:15+5:30
पैनगंगा नदीतील बोरी-चातारी येथील कोरड्या नदी पात्रात शेतकऱ्यांनी शुक्रवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यात एक शेतकरी जखमी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : पैनगंगा नदीतील बोरी-चातारी येथील कोरड्या नदी पात्रात शेतकऱ्यांनी शुक्रवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यात एक शेतकरी जखमी झाला.
गेल्या १२ नोव्हेंबरपासून बोरी-चातारी येथे पैनगंगा नदी काठावरील विदर्भ व मराठवाड्यातील ९० गावांमधील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. पैनगंगा नदीला इसापूर धरणाचा तिसरा कालवा घोषित करावा आणि नदीत त्वरित पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या आंदोलनात प्रहारसह विविध संघटनाही सहभागी झाल्या. विविध लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला भेट दिली. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत जलसंपदा मंत्र्यांची भेटही घेतली. मात्र अद्यापही तोडगा निघाला नाही.
शुक्रवारी पाच शेतकऱ्यांनी नदी पात्रात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यात शिवाजी माने, गणेश माने, प्रकाश माने, अनिल माने, देवराव माने यांचा समावेश होता. पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतले. मात्र तोपर्यंत प्रकाश माने यांचा हात जळला. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. आता हे आंदोलन आक्रमक रुप धारण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रशासनाची तारांबळ
आंदोलकांनी अचानक आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने पोलिसांसह प्रशासनाची तारांबळ उडाली. दरम्यान आमदार राजेंद्र नजरधने यांनी बुधवारी इसापूर धरणातून नदीत १५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याची मागणी लावून धरली. तथापि शासनाने अद्यापही कोणतीच भूमिका घेतली नसल्याने हे आंदोलन चिघळण्याचे संकेत आहे.