शिपायाच्या निवृत्तीला पोलीस महासंचालकांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:27 PM2019-11-01T12:27:07+5:302019-11-01T12:31:00+5:30

चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेल्या महिला शिपायाच्या सेवानिवृत्ती समारंभाला खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल यांनी उपस्थिती दर्शवून ‘पद नव्हे कामच मोठे’ हा मंत्र अवघ्या यंत्रणेच्या मनावर ठसविला.

Attendance of the Director General of Police on the retirement of soldier | शिपायाच्या निवृत्तीला पोलीस महासंचालकांची हजेरी

शिपायाच्या निवृत्तीला पोलीस महासंचालकांची हजेरी

Next
ठळक मुद्देमुख्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलययंत्रणाही अवाक्, महिलेला अश्रू अनावर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पोलीस अधिकारी म्हणजे तापट माणूस, हा गैरसमज इतिहासजमा होण्याची वेळ आली आहे. होय, प्रामाणिकपणा दिसला की कर्तव्यकठोर अधिकारीही साध्या शिपायाच्या सत्कारासाठी आपुलकीने उभा राहतो. चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेल्या महिला शिपायाच्या सेवानिवृत्ती समारंभाला खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल यांनी उपस्थिती दर्शवून ‘पद नव्हे कामच मोठे’ हा मंत्र अवघ्या यंत्रणेच्या मनावर ठसविला.
शिर्षस्थ अधिकाऱ्याने एखाद्या अगदीच कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या निरोपाला हजर राहण्याचा हा प्रसंग महासंचालक कार्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला. या प्रकाराची राज्यभर पोलीस दलात चर्चा असून महासंचालक कार्यालयातील यंत्रणाही हा प्रसंग पाहून अवाक् राहिली.
हंसा अर्जुन वोरा असे या कार्यालयीन महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. गुरुवारी ३१ आॅक्टोबर रोजी त्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. सायंकाळी ४ वाजता त्यांच्या निरोपाचा कार्यक्रम राज्य पोलीस मुख्यालयाच्या तळमजल्यावर पार पडला. यावेळी सरदार पटेल यांच्या जयंती कार्यक्रमातून खास वेळ काढून स्वत: राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल या कार्यक्रमाला हजर झाले. यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींद्र सिंघल, पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश प्रामुख्याने उपस्थित होते. स्वत: महासंचालक शिपाई महिलेच्या निरोप समारंभाला उपस्थित आहेत, त्यांना आपल्या बरोबरीने बसविले आहे हे चित्र पाहून मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बसला. यावेळी मनोगत व्यक्त करताना हंसा वोरा यांना अश्रू अनावर झाले. आपली एवढ्या वर्षाची सेवा आज फलद्रूप झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

निवृत्तीलाच सर्व लाभ देऊ - महासंचालक
पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल म्हणाले, २००१ ला आपण पहिल्यांदा या महासंचालक कार्यालयात आलो, तेव्हापासून हंसा वोरा यांचे काम पाहतो आहे. अतिशय प्रामाणिकपणे व सचोटीने त्या काम करतात. आपण केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर असताना निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच दिवशी त्याचे निवृत्तीचे सर्व लाभ त्याच्या हाती सोपविण्याची परंपरा आहे. हीच परंपरा येथेही सुरू केला जाईल. लगतच्या काळात सेवानिवृत्त होणाºया कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी निवृत्तीचे लाभ देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. पुढील वेळेपासून हा बदल करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे महासंचालकांनी सांगितले. महासंचालकांचे उपसहायक अरविंद जाधव यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले.
महासंचालकांच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे. या आगळ्यावेगळ्या निरोप समारंभाची पोलीस मुख्यालयात सुरू झालेली चर्चा राज्य पोलीस दलात सर्वदूरपर्यंत पोहोचली आहे.

Web Title: Attendance of the Director General of Police on the retirement of soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस