मान गये गुरू...! परिचर तरुणाच्या मेहनतीला यश; ‘पीएसआय’चं स्वप्न केलं साकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2022 11:44 AM2022-11-19T11:44:37+5:302022-11-19T12:11:25+5:30

एमपीएससीत मारली बाजी

Attendant Bandu Bhalekar becomes 'PSI' by clearing MPSC exam | मान गये गुरू...! परिचर तरुणाच्या मेहनतीला यश; ‘पीएसआय’चं स्वप्न केलं साकार

मान गये गुरू...! परिचर तरुणाच्या मेहनतीला यश; ‘पीएसआय’चं स्वप्न केलं साकार

googlenewsNext

अविनाश साबापूरे

यवतमाळ : अडचणी प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. पण काही जण त्याच संकटांना शस्त्र बनवून पुढे जातात. म्हणूनच पंचायत समितीमध्ये साधा परिचर म्हणून राबणाऱ्या युवकाने चक्क पोलिस उपनिरीक्षक पदावर दावा ठोकला आहे. तोही केवळ आणि केवळ गुणवत्तेच्या बळावर. एमपीएससीच्या परीक्षेतून 'साहेब' होणाऱ्या या ३१ वर्षीय तरुणाचे नाव बंडू जनार्दन भालेकर असे आहे.

बंडू मूळचा अमरावती जिल्ह्यातील जळका शहापूर गावचा शेतकऱ्याचा पोरगा. घरी गरिबी होतीच, म्हणूनच महाविद्यालयीन शिक्षण घेताघेताच त्याने नोकरीसाठी प्रयत्न केले. २०१३ मध्ये यवतमाळ जिल्हा परिषदेत परिचर म्हणून त्याला संधी मिळाली. नेर पंचायत समितीअंतर्गत शिरसगावच्या पीएचसीमध्ये त्याने २०१८ पर्यंत काम केले. मात्र परिचर म्हणून राबतानाही त्याच्या मनात पीएसआय होण्याचे स्वप्न होते.

त्याने २०१८ नंतर नेर पंचायत समिती कार्यालयातच बदली मिळविली. तेथे गेल्यावर एक महिना रात्रपाळी तर एक महिना दिवसभर असे त्याच्या ड्युटीचे स्वरूप होते. रात्रपाळीत पंचायत समितीमध्ये बसूनच त्याने स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला. तर दिवसपाळीत असताना नेर नगरपालिकेच्या लायब्ररीमध्ये तो अभ्यासाला जायचा.

या दरम्यान एक-दोनदा दिलेल्या एमपीएससी परीक्षेमध्ये अवघ्या काही गुणांनी त्याला अपयश आले. मात्र हार न मानता त्याने पुन्हा सप्टेंबर २०२२ मध्ये परीक्षा दिली आणि यशस्वी झाला. यात ४०० पैकी २६४ गुण बंडूने पटकावले. मुख्य परीक्षा पास झाल्यावर लवकरच त्याला फिजिकल टेस्ट आणि मुलाखतीला सामोरे जावे लागणार आहे. परंतु कटऑफ २३७ गुणांचा असून आपल्याला त्यापेक्षा बरेच जास्त गुण असल्याने पीएसआय म्हणून आपली निवड होणे ही केवळ औपचारिकता असल्याचे मत बंडूने लोकमतशी बोलताना व्यक्त केले. सध्या फिजिकल टेस्टसाठी तो नेरमधील नेहरू महाविद्यालयाच्या परिसरात दररोज सराव करीत आहे.

मुलाच्या वाढदिवसीच खुशखबर

बंडू ऊर्फ संग्राम भालेकर यांना वडील जनार्दन, आई लीला तसेच कल्पना व प्रतीक्षा या बहिणींकडून नेहमीच प्रोत्साहन मिळत गेले. २०१० मध्ये आईचा मृत्यू झाल्यानंतर बहिणींनी आईची माया दिली. पीएसआय होण्याच्या स्वप्नाने झपाटलेल्या बंडूचे २०२१ मध्ये लग्न झाले. तेव्हा पॉलिटेक्निक करीत असलेल्या पत्नी प्रतीक्षाने त्याला अभ्यासासाठी भरपूर साथ दिली. विशेष म्हणजे, त्यांचा मुलगा कबीर गुरुवारी एक वर्षाचा झाला आणि नेमका गुरुवारीच सायंकाळी एमपीएससीचा निकालही आला.

नेरचे दुहेरी यश; सुशीलही पास

बंडू भालेकरसोबतच नेरमधील सुशील राजेंद्र गजभिये हा शेतकरीपुत्रही पीएसआय पदाची मुख्य परीक्षा पास झाला आहे. स्पोर्ट कोट्यातून निवड झालेल्या सुशीलला १२० गुण आहेत. विशेष म्हणजे, एमपीएससीसाठी त्यांनी स्पोर्ट टीचर ही खासगी शाळेतील नोकरी सोडून अभ्यास केला.

Web Title: Attendant Bandu Bhalekar becomes 'PSI' by clearing MPSC exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.