प्रवीण दिवटेची टीप देणाऱ्या आॅफीसबॉयला कारंजात अटक
By admin | Published: September 4, 2016 12:43 AM2016-09-04T00:43:14+5:302016-09-04T00:43:14+5:30
प्रवीण दिवटे याच्या कार्यालयात काम करणाऱ्या मोनूनेच प्रवीणची टीप दिल्याचे पोलीस तपासात पुढे आले.
पाच जणांना पोलीस कोठडी : गुन्ह्यातील हत्यारे आणि वाहनांचा शोध
यवतमाळ : प्रवीण दिवटे याच्या कार्यालयात काम करणाऱ्या मोनूनेच प्रवीणची टीप दिल्याचे पोलीस तपासात पुढे आले. इतकेच नव्हे तर तो या गुन्ह्यात सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. मोनूला पोलिसांनी कारंजा येथून शुक्रवारी रात्री अटक केली.
रविकिरण उर्फ मोनू पांडुरंग बाजड (२३) रा. दत्तात्रय नगर हा दिवटेकडे आॅफीस बॉय म्हणून काम करीत होता. घटनेतील मुख्य साक्षीदार मोनू हाच आहे. त्याने मारेकऱ्यांना प्रवीण एकटा असल्याची टीप दिल्याचा संशय पोलिसांना सुरुवातीपासूनच होता. मात्र अटक झाल्याशिवाय हे स्पष्ट होणार नव्हते.
शेवटी या गुन्ह्यातील मुख्य कडी पोलिसांना गवसली असून मोनूने मारेकऱ्यांंना मोबाईल एसएमएसद्वारे माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. यावरुनच मारेकऱ्यांनी प्रवीणवर हल्ला केला. या गुन्ह्यात शुक्रवारी पोलिसांनी सोलापूर आणि पुणे येथून चार जणांना अटक केली होती. यात विशाल चंद्रशेखर दुबे, आनंद प्रेमकुमार गुप्ता, नीलेश धरमदास सोनोरे, रोहित अरविंद जाधव यांचा समावेश आहे. या आरोपींसह मोनू बाजड याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या आरोपींना ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी आरोपींनी वापरलेली हत्यारे, वाहने, मोबाईल, कपडे जप्त करायचे असल्याचे सांगून पीसीआर मागितला. या गुन्ह्यात आरोपींनी तीन रिव्हॉल्वर वापरल्याचे सांगितले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)