अंजी जंगलातून ‘अवनी’चा बछडा जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 06:21 AM2018-12-23T06:21:31+5:302018-12-23T06:22:24+5:30
गेल्या काही दिवसांपासून हत्तीच्या ताफ्यासह शोध मोहिमेवर असलेल्या वनविभागाच्या पथकाने शनिवारी सायंकाळी ४ वाजता राळेगाव परिसरातील अंजीच्या जंगलातून ‘अवनी’च्या एका मादी बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद केले.
पांढरकवडा (यवतमाळ) : गेल्या काही दिवसांपासून हत्तीच्या ताफ्यासह शोध मोहिमेवर असलेल्या वनविभागाच्या पथकाने शनिवारी सायंकाळी ४ वाजता राळेगाव परिसरातील अंजीच्या जंगलातून ‘अवनी’च्या एका मादी बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद केले. लगेच त्या बछड्याला पेंच अभयारण्याकडे रवाना करण्यात आले. एक बछडा आणि वाघ अद्यापही त्याच परिसरात असून त्यांनाही लवकरच जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
१३ जणांचे बळी घेणाºया नरभक्षी अवनी वाघिणीला २ नोव्हेंबरच्या रात्री गोळी घालून ठार मारल्यानंतर तिचे दोन बछडे अनाथ झाले. त्यांना सुरक्षित पकडून इतरत्र हलविण्यासाठी लगेच हालचाली सुरू झाल्या. शनिवारी राळेगाव परिसरातील अंजीच्या जंगलातील कक्ष क्रमांक ६५५ मध्ये दोन बछड्यांपैकी मादी बछड्याला डार्ट करून बेशुद्ध करण्यात यश आले.
लगेच त्याला पकडून विशेष वाहनाद्वारे पेंच अभयारण्याकडे रवाना करण्यात आले. आता सी-१ नामक नर बछडा व एक वाघ या दोघांना पकडण्याच्या मोहिमेला गती देण्यात आली आहे.
४ हत्तीणी होत्या मागावर
गेल्या दीड महिन्यापासून हे दोन्हीही बछडे कॅमेरात ट्रॅप होत असले तरी वनविभागाच्या पथकाला मात्र ते हुलकावणी देत होते. ८० हेक्टर जंगलाला कुंपन अंजी धरण परिसरात या बछड्यांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाल्यानंतर वनविभागाने तब्बल ८० हेक्टर जंगल परिसराला १० फूट उंच जाळीचे कुंपण करून त्यावर कापड बांधले. शिवाय मध्यप्रदेशातून या बछड्यांना पकडण्यासाठी चार हत्तींनाही पाचारण करण्यात आले होते