‘बांधकाम’च्या हद्दीतील आंब्यांचा लिलाव नाममात्र पैशात
By Admin | Published: May 18, 2017 12:55 AM2017-05-18T00:55:33+5:302017-05-18T00:55:33+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर असलेल्या आम्र वृक्षांचा लिलाव करण्यात आला असून,
कंत्राटदारांशी संगनमत : १५ लाख उत्पन्न देणारे वृक्ष सहा हजारात
विश्वनाथ महामुने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर असलेल्या आम्र वृक्षांचा लिलाव करण्यात आला असून, १५ लाख रुपये उत्पन्न देणाऱ्या या आंब्यांचा लिलाव नाममात्र सहा हजार रुपयात करण्यात आला. अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने हा प्रकार झाल्याची ओरड होत आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग महागावच्या कार्यक्षेत्रात पुसद, सवना, गुंज आणि महागाव रस्त्यावर शेकडो डेरेदार आम्रवृक्ष आहेत. या वृक्षांना यंदा मोठ्या प्रमाणात आंबे लागलेले आहेत. दरवर्षी या आंब्यांचा लिलाव केला जातो, त्यातून पैसा सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळतो. मात्र यंदा आम्रवृक्षाच्या लिलावाचे मोठे गौडबंगाल आहे. सवना येथील एका ठेकेदाराला ३१ डेरेदार वृक्ष केवळ चार हजार रुपये लिलावात दिले आहेत. महागाव-फुलसावंगी-किनवट रस्त्यावरील सहा वृक्ष फुलसावंगीच्या एका कंत्राटदाराला सहा हजार रुपयात दिले आहे. या परिसरात शेकडो वृक्ष असले तरी ३७ वृक्षांचा लिलाव करण्यात आला. एका झाडापासून पाच क्विंटल आंबे मिळण्याची शक्यता आहे. ३७ झाडांची गोळाबेरीज केल्यास दोन टन आंबा होतो. त्याची बाजारभावाने किंमत १५ लाखापेक्षा अधिक आहे. यातून शासनाला केवळ सहा लाख रुपये मिळत आहेत. गत वर्षी तर केवळ ६०० रुपयात लिलाव झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.