आॅगस्ट महिन्यातही नदी-नाले कोरडेच
By admin | Published: August 8, 2014 12:14 AM2014-08-08T00:14:49+5:302014-08-08T00:14:49+5:30
आॅगस्ट महिन्यात दुथडी भरुन वाहणारे नदी-नाले यंदा अद्यापही कोरडे आहे. पुरेशा पावसाअभावी खरिपाच्या पेरणीला तर फटका बसलाच सोबतच जवळपास ८० गावांना पाणीटंचाईची झळही बसत आहे.
महागाव : आॅगस्ट महिन्यात दुथडी भरुन वाहणारे नदी-नाले यंदा अद्यापही कोरडे आहे. पुरेशा पावसाअभावी खरिपाच्या पेरणीला तर फटका बसलाच सोबतच जवळपास ८० गावांना पाणीटंचाईची झळही बसत आहे. किरकोळ दुरुस्तीअभावी ३०० वर हातपंप बंद असून प्रशासन मात्र लक्ष द्यायला तयार नाही.
गतवर्षी महागाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. आॅगस्ट महिन्यातच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली होती. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद महागाव तालुक्यात झाली. मात्र यावर्षी महागाव तालुक्यात अद्यापही पुरेसा पाऊस पडला नाही. शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीची वेळ आली. महागाव शहरातून वाहणाऱ्या पूस नदीचे पात्र अद्यापही कोरडे आहे. पूस नदी दुथडी भरुन वाहली की तालुक्यातील पाण्याची वाढते. मात्र यावर्षी पात्र कोरडे आहे. परिणामी भूगर्भातील पाणी पातळी खालावली आहे. विहिरी, हातपंपांना अद्यापही पुरेसे पाणी नाही. यासोबतच तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा, शीप यासह लहान मोठे नालेही कोरडे आहे.
तालुक्यातील ११६ गावांपैकी ८० गावात पाणीटंचाईची झळ बसत आहे. पंचायत समितीने कृती आराखडा तयार केला होता. जिल्हा प्रशासनाने मंजुरीही दिली होती. परंतु आराखड्यातील कामांना प्रारंभच झाला नाही. त्यामुळे ५०० पैकी ३०० हातपंप किरकोळ दुरुस्तीअभावी बंद आहे. तसेच नळ योजनांचे बिल न भरल्याने अनेक गावातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)