भरधाव कारने ऑटोरिक्षाला चिरडले, चालक जागीच ठार
By सुरेंद्र राऊत | Published: April 3, 2023 06:31 PM2023-04-03T18:31:35+5:302023-04-03T18:34:07+5:30
जिल्हा परिषदेसमाेर अपघात : कारचालक घटनास्थळावरून पसार
यवतमाळ : शहरात रॅश ड्रायव्हिंगचा प्रकार वाढला आहे. सोमवारी पहाटे ३.१५ वाजता येथील जिल्हा परिषदेसमोर भरधाव कारने ऑटोरिक्षाला मागून जबर धडक दिली. यात ऑटोरिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कार चालकाने तेथून पळ काढला. काही वेळानंतर हीच कार संतसेना चोक परिसरात उभी असताना अचानक पेटली. यात संपूर्ण कार जळून खाक झाली.
जय सुनील काठोडे (२३, रा. रोहिणी सोसायटी, जांब रोड, यवतमाळ) असे मृत ऑटोरिक्षा चालकाचे नाव आहे. जय हा नेहमीप्रमाणे बसस्थानक चोकात पहाटे येणाऱ्या ट्रॅव्हल्सवर भाडे शोधण्यासाठी जात होता. जिल्हा परिषदेसमोर ऑटोरिक्षा रस्त्याच्या बाजूला उभी करून थांबला असताना, भरधाव वेगाने आलेल्या एमजी हेक्टर कार क्रमांक एम एच २९/बीपी /०९९९ च्या चालकाने जोरदार धडक दिली. यात ऑटोरिक्षा (एम एच २९/५८२१) मध्ये बसून असलेला जय काठोडे याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. तो जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळला असताना भरधाव कार चालक तेथून पळून गेला.
यावेळी सोबत असलेल्या रवी रामेश्वर मडावी याने मदतीसाठी रूपेश गज्जलवार (रा. उमरसरा) याला फोन करून बोलावले. रूपेश आल्यानंतर दोघांनी जखमी जय याला शासकीय रुग्णालयात दाखल केला. डॉक्टरांनी जय काठोडे याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी रवी मडावी याच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी कार चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून जीवितहानी केल्याचा गुन्हा दाखल केला.
अपघातग्रस्त कार अचानक पेटली
ऑटोरिक्षा चालकाला धडक देऊन ठार करणारी कार संतसेना चौक परिसरात उभी होती. या कारने सोमवारी सकाळी अचानक पेट घेतला. उभी कार पेटत असतना अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत ही कार जळून खाक झाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या कारचा क्रमांक एम एच २९ /बीपी/ ०९९९ असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दोन्ही घटनांचा तपास अवधूतवाडी पोलिस करीत आहेत.