मराठी साहित्य संमेलनात अवलिया कलावंत पेरतोय माणुसकीची बिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:58 PM2019-01-11T23:58:09+5:302019-01-11T23:58:56+5:30
सोलापूर जिल्ह्यातील एका प्रसिध्द नाट्य कलावंताला यवतमाळातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कुठलेही निमंत्रण नाही. असे असले तरी, त्याने याठिकाणी हजेरी लावून गाडगेबाबांच्या वेशात शेतकऱ्यांच्या व्यथेसह अनेक ज्वलंत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे.
गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : सोलापूर जिल्ह्यातील एका प्रसिध्द नाट्य कलावंताला यवतमाळातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कुठलेही निमंत्रण नाही. असे असले तरी, त्याने याठिकाणी हजेरी लावून गाडगेबाबांच्या वेशात शेतकऱ्यांच्या व्यथेसह अनेक ज्वलंत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे. एवढेच नव्हे तर महिलांची महती कथन करून ‘लेक वाचवा-लेक शिकवा’ हा संदेश तो देत आहे. संत गाडगेबाबांच्या रुपाने मानवतेचा संदेश देऊन माणुसकीची बिजे पेरण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांची ही पोटतिडक कोणाच्याही नजरेतून सुटत नाही. या अवलिया कलावंताचे नाव आहे फुलचंद नागटिळक़ खैराळा ता.मांढा जि. सोलापूर हे त्याचे गाव.
फुलचंद यांनी ‘नटसम्राट’ हा एकपात्री प्रयोग चार हजार ६२२ वेळा सादर केला आहे. ‘मायभूमी’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे. ‘मला भेटलेली माणसे’ या त्यांच्या व्यक्तीरेखेला मोठी पसंती मिळाली आहे. जीवन जगताना त्यांना मिळालेल्या अनुभवाचे गाठोडे ते येथील साहित्य संमेलनात लोकांपुढे सोडत आहे. येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक कारणांनी गाजत आहे. असे असले तरी, फुलचंद हा एक नाट्यकलावंत माणुसकीचा संदेश देऊन लोकांसोबतच साहित्यिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविताना दिसतो. आम्ही साहित्य लिहितो, बोलतो, साहित्य खातो-पितो पण आचरणात आणणारे किती लोक आहे, असा त्यांचा सडेतोड सवाल अनेकांना निरुतर करतो आहे. मराठीची अस्मिता राखण्याचं काम कोण्या एकाचे नाही तर मराठीचा जागर सर्वांनी एकत्र येऊन केला पाहिजे. नजर, वाचा, मन आणि कर्म शुध्द असणे महत्वाचे आहे. कुठल्याही स्वार्थ हेतूने केलेले कार्य तडीस जात नाही. जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. पण त्यांच्या प्रश्नाकडे सर्वांनी दुर्लक्ष चालविले आहे. परिणामी तो आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतो आहे, हे सर्वांचे अपयश आहे. अनेक साहित्यिक आयत्या ‘मटेरियल’वर लिहून टिमकी मिरविण्यात धन्यता मानत आहे. खरं तर प्रसंग जगून प्रत्यक्षात येणारे साहित्य हेच खरे साहित्य असते. यात किती जण यशस्वी होतात, हा त्यांचा प्रश्न आहे. तसे पाहिले तर त्यांच्या प्रश्नातील ताकद कोणीही नाकारु शकत नाही. आज देशात अनेक मानवीय मुलभूत प्रश्न असताना इतर विषयांवरच अधिक चर्चा होते. याविषयी फुलचंद यांना जी चिंता आहे, तीच सर्वांचीच असेल. येणाºया तीन दिवसात हा अवलिया ‘परिवर्तन’ करण्याची मीमांसा बाळगून आहे.